अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी
चंद्रपुर :- केंद्र शासन पुरस्कृत अमृत पाणीपुरवठा योजना सुरु करण्यात आली. या योजनेअंतर्गत पूर्णतः नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु आहे. योजनेची बरीच कामे पूर्ण झाली. चंद्रपूर शहर अजूनही टँकरमुक्त झाले नाही. एक दिवस आड पाणीपुरवठा होत असल्याने आजही काही भागांत चार टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ महानगर पालिकेवर आली आहे. अमृत नळ योजनेचे काम काही भागात सुरूच आहे. मीटर लागले पण पाणीपुरवठा नाही, अशी स्थिती आहे. पाणी गळतीवरही प्रशासनाला मात करता आली नाही.
महापालिकेची अमृतच्या दुसऱ्या टप्प्यावर मदार
वाढत्या लोकसंख्येनुसार पहिल्या टप्प्यातील अमृत नळ योजना मुबलक पाणीपुरवठ्यास पुरेसे नाही. हे स्पष्ट झाल्याने मनपाने अमृत अभियान २ राबविण्याचा प्रकल्प अहवाल तयार केला.
अमृत अभियान २ प्रकल्पाला ३०७ कोटी ६५ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. इरई धरणातून सध्या उचलण्यात येणारे ४५ एमएलडी पाणी दुपटीने वाढ करण्याचा प्रस्ताव आहे.
अमृत अभियान २ प्रकल्पाला जीवन प्राधिकरणाची तांत्रिक मान्यता मिळाली. अमृतसाठी केंद्र शासन ३३.३३ टक्के, राज्य शासन ३६.६७ टक्के व मनपाचा हिस्सा ३० टक्के राहणार आहे.