नागरिकांच्या सुविधेसाठी बँकेत कॅश काउंटर वाढविण्याची मागणी!
भद्रावती उमेश कांबळे : –
लॉक डाऊन च्या संदर्भातील महत्वाच्या बाबीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या भद्रावती शाखेतर्फे तहसिलदार महेश शितोळे यांना निवेदन देण्यात आले. सध्या संपूर्ण देशात कोरोनामुळे लॉक डाऊन करण्यात आलेले आहे. प्रशासनातर्फे महत्वाच्या कामांमध्ये योग्य सामाजिक अंतर पाळण्याच्या वारंवार सूचना करण्यात येत आहेत.
मात्र, भद्रावती शहरातील बँक ऑफ इंडिया व बँक ऑफ महाराष्ट्र या दोन बँकांमध्ये नागरिकांची गर्दी होत आहे. निवृतीवेतन धारक तसेच ईतरही नागरिक योग्य सामाजिक अंतर न ठेवता गर्दी करून रांगेत उभे असतात. त्यामुळे सामाजिक अंतर नियमाची पायमल्ली होत आहे. यामुळे कोरोना या महाभयंकर साथीचा शिरकाव व प्रादुर्भाव होण्यास वेळ लागणार नाही.
सदर बँकांमध्ये कॅश काउंटरची संख्या वाढवून गर्दी कमी करण्यात यावी, तसेच योग्य सामाजिक अंतर पाळण्याच्या दृष्टीने व्यवस्था करण्याच्या सुचना बँकांना देण्यात याव्या, अशी मागणी यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा भद्रावतीचे अध्यक्ष ईश्वर शर्मा, कार्याध्यक्ष अशोक पोतदार, उपाध्यक्ष वतन लोणे, सरचिटणीस अब्बास अजाणी, संघटक जावेद शेख, प्रसिद्धी प्रमुख उमेश कांबळे, सदस्य रूपचंद धारणे, सुनिल बिपटे, शंकर बोरघरे, सुनिल पतरंगे, संतोष शिवनकर, महेश निमसटकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.