Home चंद्रपूर लक्षवेधी :- चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारांना राजाश्रय मिळाल्याने गुन्हेगारीत वाढ, एक चिंतन.

लक्षवेधी :- चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारांना राजाश्रय मिळाल्याने गुन्हेगारीत वाढ, एक चिंतन.

शांतताप्रिय जिल्ह्यात राजकीय पक्षाच्या आडोशाने गुन्हेगार वाढले, सर्वसामान्य जनतेत संताप.

लक्षवेधी ✍️

चंद्रपूर जिल्ह्यात स्वर्गीय शांतारामजी पोटदुखे खासदार म्हणून कित्तेक वर्ष कार्यरत राहिले, पण त्यांनी आपल्या शैक्षणिक संस्थेच्या अतिरिक्त कुठल्याही अवैध व्यवसायात डोके घातले नव्हते, पण त्यांच्या राजकीय अस्तानंतर हंसराज अहिर लोकसभेत खासदार निवडून आले, नरेश पुगलिया निवडून आले आणि एक वेगळ्या प्रकारचा राजकीय ट्रेंड सुरू झाला, आपली राजकीय ताकत मोठी करण्यासाठी दबंग युवा कार्यकर्ते यांचा समूह तयार झाला आणि मग सुरू झाली स्वतःला मोठं करण्याची स्पर्धा, तेव्हाची रॉकेल चोरी असो, कोळसा चोरी असो की डिझेल चोरी त्यात राजकीय आशीर्वाद असलेले कार्यकर्ते शिरले आणि आपापला क्षेत्रात त्या धंद्यावर प्रभुत्व मिळविण्यासाठी दबंगगिरी सुरू केली, त्यात आणखी काही राजकीय पक्षाचे दबंग युवा कार्यकर्ते प्रस्थापिताना शह देण्यासाठी संघर्ष करतं असतांना टोळ्या बनल्या आणि गुन्हेगारीला बळ मिळाले, दरम्यान माझ्याशिवाय दुसरा वरचढ नको म्हणून गैगवार सुरू झाले. त्या काळातील लालपेठ येथील एक हत्त्या अशीच राजकीय द्वेशापोटी आणि स्पर्धेपोटी झाली होती,

जिल्ह्याच्या राजकारणात गुन्हेगारी क्षेत्रातील काही लोकं शिरले, त्यांना पक्षात मोठे पद मिळाले त्यातील काही लोकप्रतिनिधी म्हणून निवडून सुद्धा आले, यात नगरसेवक ते आमदार खासदार अशा अनेक पदावर राजकीय गुंडगिरी करणाऱ्यांची वर्णी लागली, त्यानंतर लोकप्रतिनिधी यांचा प्रशासनावर असलेल्या दबावाचा फायदा घेऊन अवैध धंदे सुरू झाले त्यात अवैध दारू, रेती, कोळसा इत्यादीच्या धंद्यात राजकीय पुढाऱ्यांच्या माध्यमातून राजकीय गुन्हेगारी फोफावली, राजकीय वर्दहस्त आणि गुन्हेगारांना राजकीय आश्रय मिळाल्यापासून किंबहुना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी राजकारणात प्रवेश केल्यापासून जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख वाढत आहे. गोळीबार, चाकू, तलवारींचे हल्ले अशा घटनांमध्ये सातत्याने वाढ झाली आहे. या हल्ल्यात अनेकांना जीवदेखील गमवावा लागला आहे.

औद्योगिक जिल्हा असलेला चंद्रपूर हा राज्याच्या राजकारणात अतिशय शांत जिल्हा म्हणून ओळखला जात होता. सर्व जिल्ह्यांप्रमाणे येथेही विविध राजकीय पक्षांमध्ये सक्रिय नेत्यांमध्ये गटबाजी होती व आहे सुद्धा. पण या जिल्ह्यात यापूर्वी कधीच राजकीय नेत्यांनी गुन्हेगारांना आश्रय मिळवून दिला नाही. मात्र सन २०१४ नंतर जिल्ह्यातील राजकारणात अतिशय वेगाने बदल घडून आला. काही राजकारणी लोकांनी गुंडाच्या टोळ्या तयार करून त्यांचे पोलिसांकडून संरक्षण करतं अवैध धंद्याना बळ मिळवून दिले, त्यात स्वतःचा आर्थिक स्वार्थ साधला पर्यायाने अवैध दारू विक्री, कोळसा चोरी, घुटका विक्री, ऑनलाईन लाटरी सट्टा आणि अवैध रेती वाहतूक यातून गुंडाना काम मिळाले आणि या राजकीय नेत्यांना पैसे मिळत गेले, मात्र अवैध धंद्याच्या विरोधात आवाज उचलणाऱ्यावर याचं राजकारणी लोकांनी खुनी हल्ले करण्यास सुरुवात केली मग ते पत्रकार असो की सामाजिक राजकीय कार्यकर्ते, ज्यांच्याकडे “गुंडाची टोळी तोच नेता भारी” अशी नवी ओळख राजकीय क्षितिजावर अनेक नेत्यांनी निर्माण केली, मग राजकीय नेत्यांच्या ईशाऱ्यांनी गोळीबार, सार्वजनिक ठिकाणी हल्ले, तलवार चाकूचा धाक दाखवून पत्रकार सामाजिक कार्यकर्ते यांना दहशतीत ठेवण्याचे कारस्थान रचले गेले आणि अवैध धंदे खुलेआम सुरू झाले, यात पोलीस प्रशासनाचे अधिकारी यांचा सुद्धा मोलाचा वाटा म्हणावा लागेल.

आता तर खुनी हल्ले करण्याच्या घटना सातत्याने वाढताना दिसत आहेत. ही हिम्मत आली कुठून तर राजकारण्यांनी पोसून ठेवलेल्या गावगुंडांमुळे व राजकारण्यांनी या गावगुंडांना पक्षात प्रवेश दिला तेव्हापासून गुन्हेगारी वाढीस लागली आहे. त्यात कोळसा, वाळू, दारू, गुटखा, क्रिकेट ऑनलाइन सट्टा या सर्व अवैध व्यवसायांना राजकारण्यांसोबतच प्रामाणिक अधिकारी वगळता पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांचा आशीर्वाद आहे. त्यातूनच गोळीबार, चाकू हल्ले, तलवार व टोळी युद्धासारख्या घटना सातत्याने घडताना दिसत आहेत. गुरुवारी मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्यावर अतिशय वर्दळीचे ठिकाण असलेल्या रघुवंशी कॉम्पलेक्समध्ये गोळीबार झाला. विशेष म्हणजे गोळीबार करणारा अतिशय आरामात कॉम्पलेक्समध्ये आला व सर्वादेखत त्याने अंधेवार यांच्यावर गोळी झाडली. आज रविवारला बल्लारपूर येथील गांधी चौकात मालू वस्त्र भंडार दुकानावर पेट्रोल बॉम्ब हल्ला व गोळीबार झाला त्यात एक दुकानाचा नौकर जखमी झाला. काही दिवसापूर्वी बल्लारपूर परिसरातील वेकोली येथे सुरक्षा रक्षकाचा जीव गेला, या सर्व घटना ह्या राजकीय आशीर्वादाने संघटित गुन्हेगारीतून घडल्या हे विशेष.

बल्लारपूर येथे २०२० मध्ये अवैध दारू व कोळसा व्यवसायात गुंतलेल्या सूरज बहुरिया याची हत्त्या झाली, त्यात अमन अंदेवार हा मुख्य आरोपी होता, दरम्यान बहुरिया याला कुणाचा राजकीय आशीर्वाद होता हे सर्वश्रृत होते. गोळीबारातून घडलेले बहुरिया हत्याकांड आणि त्याची अंत्ययात्रा बघता यापुढे हे प्रकरण इथे संपणार नाही असे वाटतं असतांना आता अमन अंधेवार यांच्यावर गोळीबार झाला व यापूर्वी त्याचे बंधू चिन्ना याचेवर याच ठिकाणी खुनी हल्ला झाला होता. त्यामुळे हत्त्याचे सत्र यापुढे पण सुरू राहणार अशी शक्यता बळावली आहे, अर्थात जोपर्यंत गुन्हेगारांना राजकीय आश्रय मिळत राहणार तो पर्यंत असे खुनी हल्ले होतच राहणार असे स्पष्ट संकेत मिळत आहे. कारण यापूर्वी देखील गोळीबार व हल्ल्याच्या अनेक घटना या जिल्ह्यात घडलेल्या आहेत. घुग्घुस येथे राष्ट्रवादी शहर अध्यक्ष कमटम याची रस्त्यावर तलवारीने वार करून हत्या करण्यात आली होती. त्याचबरोबर माजरी येथे मनसे नेता नंदू सूर याची हत्या झाली होती. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर मूल शहरात गोळीबार झाला. या गोळीबारातील आरोपी आजही तुरुंगात आहेत. २४ जुलै २०२३ रोजी राजुरा येथे पूर्वशा डोहे हिच्यावर तर घरात गोळी चालली. यात तिचा मृत्यू झाला. ३१ जानेवारी २०२१ मध्ये राजू यादव याची हत्या गोळीबारातून झाली. ८ ऑगस्ट २०२० मध्ये सुरज बहुरिया याची हत्या झाली तर शिवा वझरकर या युवा शिवसैनिकाची अशीच हत्या वर्षभरापूर्वी झाली. विशेष म्हणजे, या सर्व हत्यांमध्ये कुठे ना कुठे अवैध व्यवसाय व राजकारणाचा संबंध आहे. या सर्व घटना बघता चंद्रपूर जिल्हा एका वेगळ्याच दिशेने वाटचाल करतांना दिसत आहे. याकरिता जिल्ह्यातील सर्व पक्षीय राजकारणी नेत्यांनी व त्यांच्या वरिष्ठानी गुन्हेगारी क्षेत्रात वावरणाऱ्या गुंडाना बाजूला सारून व पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून दूर केल्यास गुन्हेगारीवर आळा बसेल व चंद्रपूर जिल्ह्याला पुन्हा गतवैभव प्राप्त होईल अन्यथा या पुन्हा अशाच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या राजकीय संरक्षण असलेल्या गुंडाकडून खुनी हल्ले व गोळीबार होतं राहिलं आणि राजकीय नेते या गावगुंडाचा फायदा घेत आपली राजकीय चमकोगिरी सुरूच ठेवेल, याचे चिंतन करण्याची वेळ आता येथील सुजाण जनतेवर आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here