इकडे मनसेची जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार, आजच्या दोन्ही सत्रातील परीक्षा रद्द नोकर भरतीही थांबणार?
चंद्रपूर :-
चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या नोकर भरतीची परीक्षा दिनांक 21 डिसेंबर सकाळी 10.00 वाजता सुरु होताच वादात सापडली असून परीक्षा सुरू असताना संगणकात एकच प्रश्न व उत्तर अनेक वेळा येत असल्यामुळे तसेच तांत्रिक बिघाडाने ही परीक्षा थांबली असल्याने एकच खळबळ उडाली, मात्र ही तांत्रिक बिघाड केवळ चंद्रपूर येथीलच नसून नागपूर गोंदिया यासह अनेक ठिकाणी असल्याने परीक्षा घेणाऱ्या आयटीआय कंपनीच्या पोर्टल मधेच घोळ झाला असल्याने सर्वच ठिकाणच्या आज होणाऱ्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहे, मात्र ही परीक्षा पुन्हा 23 डिसेंबरला होणार असून राज्यातील अनेक जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यांना दोन दिवस राहण्याची व खाण्यापिण्याची व्यवस्था कोण करेल व चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी बाहेर जिल्ह्यात परीक्षा देत आहे त्यांची व्यवस्था कोण करेल हा अतिशय गंभीर प्रश्न असून या परीक्षा घेणाऱ्या बैंक अध्यक्ष संचालक व कंपनीच्या व्यवस्थापनावर गुन्हे दाखल करा अशी मागणी मनसे तर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे. दरम्यान या गंभीर प्रकरणाची दखल घेत राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांनी विधिमंडळ सभागृहात सीडीसीसी बैंकेच्या नोकर भरतीच्या परीक्षेत होतं असलेला घोळ समोर आणला. विधिमंडळ कामकाजात सहभाग घेत त्यांनी Point of Information हे संवैधानिक आयुध वापरून चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आज झालेल्या परीक्षेत परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना आढळून आलेले तांत्रिक गैरवर्तन तसेच काही विद्यार्थ्यांना पास करण्याच्या दृष्टीने मिळत असलेली संशयास्पद वागणूक सभागृहासमोर मांडून यासंदर्भात शासनाने तातडीने कार्यवाही करावी तसेच सदर परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी सभागृहाचे सभापती यांचेमार्फत शासनाकडे मागणी केली आहे. त्यामुळे आता बैंक नोकर भरती वादात सापडली असून दोन दिवस चालणाऱ्या परीक्षा होतात किंव्हा नाही याबाबत संभ्रम निर्माण होतं आहे.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरतीत मागासवर्गीयांचे आरक्षण संपवून खुल्या प्रवर्गात होणाऱ्या नोकर भरतीत एका जागेसाठी 25 ते 40 लाख रुपये घेतले जात असल्याचा आरोप करत ही बेकायदेशीर बैंक नोकर भरती रद्द करावी व एससी एसटी व ओबीसी प्रवर्गातील सर्व घटकांना आरक्षण देऊन नव्याने भरती प्रक्रिया राबवावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सहकार आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती, यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिका पण दाखल केली होती, मात्र त्याआधी बैंक संचालकांच्या भ्रष्ट नितीने ह्या नोकर भरतीच्या परीक्षेला सुरुवात आज झाली पण सकाळी 10.00 वाजता परीक्षा सुरू असताना संगणकात एकच प्रश्न व उत्तर अनेक वेळा येत असल्याने तसेच तांत्रिक बिघाड होतं असल्याने विद्यार्थ्यांनी गोंधळ घालत परीक्षा बंद पाडली व परीक्षा केंद्राच्या बाहेर येत परीक्षा घेणाऱ्या विरोधात नारेबाजी सुरू केली आहे. त्यामुळे तणाव निर्माण झाल्याने पोलिसांना बोलाविण्यात आले व बैंक व्यवस्थापनाला याबाबत सूचित करण्यात आले, परंतु काही वेळातच आज होणारी परीक्षा ही 23 डिसेंबरला होईल असे सांगण्यात आले. पण जे विद्यार्थी राज्याच्या कानाकोपऱ्यातून परीक्षा देण्यासाठी आले त्यांना दोन दिवस खाण्यापिण्याचा राहण्याचा खर्च कोण करेल? हा गंभीर प्रश्न असून गरीब विद्यार्थ्यांनी संतप्त होऊन बैंक अध्यक्ष, संचालक व परीक्षा घेणाऱ्या आयटीआय कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
काय आहे परीक्षेचा घोळ ?
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत लिपिक २६१ व शिपाई ९७ अशा एकूण ३५८ पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू आली आहे. २१, २२ व २३ डिसेंबर रोजी या पदांसाठी ऑनलाईन परीक्षा घेतली जात आहे. ही परीक्षा सुरू असताना चंद्रपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात चुकीचे प्रश्न दिल्याने विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला आहे. राज्यातील सर्वच परीक्षा केंद्रावर ऑनलाईन संगणक सर्वर डाऊन झाल्याने अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राबाहेर येत गोंधळ घालून परीक्षा बंद पाडली आहे. तसेच अनेक विद्यार्थी चंद्रपूर बँकेत फोन करून याबाबतची माहिती देत होते मात्र बँकेकडून कोणीही फोन घेऊन उत्तर देत नसल्याने विद्यार्थी आणखीच संतापले होते. दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करून विद्यार्थ्यांचा गोंधळ शांत केला, परंतु ह्या नोकर भरती परीक्षेच्या ऑनलाईन मध्ये केवळ चंद्रपूर चं नाही तर सगळ्यां परीक्षा केंद्रात हे घडले असल्याने ऑनलाईन सर्व परीक्षाचं रद्द करण्यात याव्या अशी पण मागणी मनसे कडून करण्यात आली.
किती उमेदवार व कुठल्या जिल्ह्यात परीक्षा?
या परीक्षेसाठी राज्यभरातून ३१ हजार १५६ उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज आले आहेत. ही परीक्षा राज्यातील नऊ जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर सुरू आहे. दरम्यान चंद्रपूर जिल्हा बँकेची परीक्षा चंद्रपूर जिल्ह्यात घेण्यात यावी, पण ती विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, अमरावती व गोंदिया या चार जिल्ह्यासोबतच पुणे, नाशिक, औरंगाबाद, जालना, नांदेड या जिल्ह्याच्या परीक्षा केंद्रात घेतल्या जात आहेत. त्यामुळे बैंक संचालक एजंट यांनी ज्या उमेदवारांकडून पैसे घेतले त्यांना पास करून कोट्यावधी रुपयांचा घोटाळा असून याची आर्थिक गुन्हे शाखे मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली आहे यावेळी मनसेचे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, जनहीत कक्ष जिल्हाध्यक्ष रमेश कालबांधे, सुनील गुढे व इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
रद्द झालेल्या परीक्षाबाबत असा काढला बैंकेने नोटीस.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची परिक्षा प्रणाली राबविणारी ITI Ltd. (Central Govt. Undertaking) कंपनीकडून कळविल्याप्रमाणे दि. २१ डिसेंबर २०२४ रोजी शिपाई या पदासाठी आयोजीत परिक्षा अपरिहार्य परिस्थितीमुळे हया परिक्षेच्या दोन्हीही शिफ्टस् रद्य करण्यांत आलेल्या असून नंतरच्या तारखेला घेण्यांत येतील.
परिक्षा साफ्टवेअर मधील तांत्रिक बिघाडामुळे दि. २१ डिसेंबर २०२४ रोजीच्या सकाळच्या शिफ्टच्या उमेदवारांचे पॅनलवर प्रश्न आणि उत्तरांचे पर्याय प्रदर्शित करतांना अनियमितता झाल्याची तकार आली आहे. त्यामुळे परिक्षेच्या अखंडतेचे रक्षण करण्यासाठी दोन्हीही शिफ्ट रद्य करण्यांत आल्या आहेत.
बँकेच्या दि. २२ व २३ डिसेंबर २०२४ रोजीची परिक्षा वेळापत्रकानुसार घेतल्या जातील असे ITI Ltd. कंपनीने कळविले आहे. सर्व उमेदवारांना कळविण्यांत येते की, हे केवळ तांत्रिक समस्येमुळे झाले आहे आणि परिक्षेच्या सुरक्षिततेशी व गोपनीयतेशी कोणतीही तडजोड केलेली नाही व केली जाणार नाही.
पुढील सुचनेसाठी उमेदवारांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेची भरतीची अधिकृत वेबसाईट पाहावी.
आपण केलेल्या सहकार्याबद्यल धन्यवाद !