इमानदारी संपली का ? पगार पुरेना; लाचखोरीत ‘शिक्षण विभाग’ एक नंबर
११ महिन्यांत १० कारवाया : अधिकारी व कर्मचाऱ्यांची लाचेची हाव सुटेना
चंद्रपूर :- कठोर परिश्रम घेऊन शासकीय खुर्चीवर बसताच अधिकारी व कर्मचारी पैशांच्या मागे लागत असल्याचे चित्र एसीबीच्या कारवाईवरून दिसून येते. मागील अकरा महिन्यांत चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने दहा कारवाया करून १७ लाचखोरांना बेड्या ठोकल्या आहेत,
News reporter :- अतुल दिघाडे
शासकीय कार्यालयात काम करताना सर्वसामान्यांकडून कुठल्याची प्रकारची मागणी करू नये, असे स्पष्ट निर्देश आहेत. अनेक विभागांत, तर नौकरीवर रुजू होताना प्रामाणिकपणे कर्तव्य बजावण्याची शपथही दिली आहे,
तरीही, अनेक अधिकारी व कर्मचारी आर्थिक हव्यासापोटी पैशांची मागणी करतात, अशा कर्मचाऱ्यांवर अंकुश लावण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यरत असतो. या विभागाकडे आलेल्या तक्रारीवरून मागील अकरा महिन्यांत दहा कारावाया करून १७ जणांना बेड्या ठोकल्या, यामध्ये सर्वाधिक टॅप हे शिक्षण विभागात करण्यात आले आहेत, तर सन २०२३ मध्येसुद्धा शिक्षण विभागात एक ट्रॅप झाला होता
भरपूर पगार; तरी पुरेना
शासकीय नोकरदार मग तो कोणत्याही पदावर असला, तरी त्याला बऱ्यापैकी पगार आहे. काही विभागांत तर लाखांपेक्षा अधिक पगार आहे, तरीही लाच घेण्याची हाव सुटत नसल्याचे चित्र कारवाईवरून दिसते.
शिक्षण विभागात सर्वाधिक लाचखोर
चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईवरून जिल्ह्यात शिक्षण विभागात सर्वाधिक लाचखोर असल्याचे दिसून येत आहे. मागील अकरा महिन्यांत शिक्षण विभागात तीन टॅप करण्यात आले. यात तब्बल आठ जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
लाचखोरीची कीड संपणार कधी ?
कोणत्याही कामासाठी लाच घेणे व देणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र, बऱ्याचदा छोट्या-मोठ्या कामासाठी चिरीमिरी घेतल्या जात असल्याचे चित्र दिसून येते. लाचखोरीची ही कीड कधी संपणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
११ महिन्यांत १० कारवायाः १७ लाचखोर जाळ्यात
क्लास टू’ला लाचेचा मोह अधिक
■ मागील अकरा महिन्यांत चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत बहुतांश क्लास टूचे अधिकारी सापडले आहेत
■ यावरून त्यांना लाच घेण्याचा मोह आवरत नसल्याचे दिसून येत आहे.
लाचखोरीबाबत तक्रार कुठे करणार?
■ कुणी लाच मागत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी किंवा १०६४ या टोल फ्री क्रमांकावर किया ०७१७२-२५२२५१ यावर तक्रार करता येते. लाचखोराची तक्रार करणाऱ्याचे नाव गुप्त असते.
पोलिस उपअधीक्षक म्हणतात…
कोणत्याही कामासाठी शासकीय अधिकारी वा कर्मचाऱ्यांना लाच देणे किंवा घेणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे कुणीही बेकायदेशीररीत्या पैशांची मागणी करत असल्यास चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी किंवा १०६४ या टोल फ्री नंबरवर किंवा ०७१७२-२५२२५१ यावर तकार करावी. – मंजुषा भोसले, पोलिस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर