राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री जयंतीनिमित जनता महाविद्यालयात प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन
चंद्रपूर :- चंद्रपूर येथील स्थानिक चांदा शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित जनता महाविद्यालय, चंद्रपूर येथे संस्थेचे सचिव डॉ. अशोकभाऊ जिवतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. २ ऑक्टोबर २०२५ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. के. महातळे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
News reporter :- अतुल दिघाडे
प्रारंभी प्रास्ताविक करताना क्रांतीवीर सिडाम याने गांधीजी व शास्त्रीजींच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. त्याने सांगितले की महात्मा गांधी हे केवळ भारताचेच नव्हे तर संपूर्ण जगासाठी शांती, सत्य व अहिंसेचे प्रतीक आहेत. गांधीजींच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्य लढ्यामुळे भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले. सत्याग्रह, असहकार, खादी चळवळ, हरिजन सेवा, ग्रामस्वराज्य यांसारख्या उपक्रमांनी गांधीजींनी भारतीय समाजात जागृती निर्माण केली.
तसेच माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांनी त्यांच्या प्रामाणिक, साध्या व समर्पित जीवनातून भारतीय राजकारणाला नवी दिशा दिली. “जय जवान, जय किसान” हा त्यांचा घोषवाक्य आजही प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे. त्याने आपल्या भाषणात पुढे असे नमूद केले की गांधीजी व शास्त्रीजी यांच्या विचारांचे आजच्या पिढीने अनुसरण करणे अत्यंत आवश्यक आहे. भ्रष्टाचार, हिंसा, पर्यावरणीय समस्या अशा आधुनिक संकटांना तोंड देण्यासाठी गांधीजींचे सत्य-अहिंसा तत्त्व आणि शास्त्रीजींचे साधेपण व शिस्त हीच खरी दिशा दाखवणारी मूल्ये आहेत.
यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. के. महातळे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही दोन्ही महान नेत्यांच्या प्रतिमांना पुष्पहार व पुष्पांजली अर्पण करून त्यांना अभिवादन केले
एकूणच, गांधीजी आणि शास्त्रीजींच्या जयंतीनिमित्त झालेला हा कार्यक्रम अत्यंत भावनिक, प्रेरणादायी आणि विचारप्रवर्तक ठरला. उपस्थित प्रत्येकाच्या मनात राष्ट्रप्रेम, सामाजिक जबाबदारी व नैतिकतेचे मूल्य दृढ झाले.