Home Breaking News प्रतीक्षा संपली नागपूरसह चंद्रपुरात आज आकाशात ढग उद्या जोराचा पाऊस

प्रतीक्षा संपली नागपूरसह चंद्रपुरात आज आकाशात ढग उद्या जोराचा पाऊस

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

नागपूर  :-  चटके देणाऱ्या उन्हाच्या झळा आणि उबविणाऱ्या दमट उकाड्याने नागपूरकरासह चंद्रपूरकरांना हैराण करून सोडले आहे. मंगळवारीही ४१.४ अंश कमाल तापमानाची नोंद झाली, जे सरासरीपेक्षा ६.३ अंशांनी अधिक होते.त्यामुळे मान्सूनची प्रतीक्षा नागपूरकरांना आणि चंद्रपूकरांना लागली आहे. मात्र, ही प्रतीक्षा संपणार आहे. हवामान खात्याकडून तशी गुड न्यूज आली आहे. २२ जूनला आकाश ढगांनी व्यापणार असून, वादळ व विजांच्या कडकडाटांसह हलका पाऊस होईल. पण, त्यानंतर २३ रोजी जोरदार पावसाचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. तत्पूर्वी आणखी एक दिवस लोकांना उकाडा सहन करावा लागेल.

हवामान विभागानुसार सध्या दक्षिण-पश्चिम मान्सून पूर्वोत्तर राज्यांकडे वाढत आहे. मात्र, महाराष्ट्रात मान्सूनची रेषा ११ जूनपासून आतापर्यंत एकाच स्थळी थांबली आहे. आनंदाची बाब म्हणजे आता मान्सून पश्चिम मध्य व दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरातून होत आंध्रप्रदेशच्या सीमावर्ती भागात सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार होत आहे, ज्यामुळे मध्य भारतात आर्द्रता प्रवेश करू शकते. सायक्लोनिक सर्क्युलेशनसह कमी दाबाचे क्षेत्र उत्तर- पश्चिम मध्य प्रदेश, दक्षिण-पश्चिम उत्तरप्रदेश आणि राजस्थानकडे तयार होत आहे. अरबी समुद्रातही हालचाल दिसून येत आहे. त्यामुळे वातावरण बदलेल आणि वेगवान वायासह पाऊस होईल, असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे पारा ४० अंशांच्या खाली घसरेल आणि उकाड्यापासून दिलासा मिळेल.साधारणपणे जूनच्या सुरुवातीपासून कमाल तापमान खाली घसरत असते आणि जूनच्या दुसऱ्या पंधरवाड्यात मान्सून किंवा मान्सूनपूर्व पावसाच्या सरी येत असतात. मात्र, यंदा जूनच्या सुरुवातीपासून पारा ४१ ते ४२ अंशांवर कायम आहे. उन्हाच्या झळा व दमट उकाड्याने नागरिकांना त्रासवून सोडले आहे. मंगळवारीही तापमान ६ अंशांच्या वर होते व उष्ण लाटेची स्थिती कायम होती. विदर्भाच्या इतर जिल्ह्यांतही पारा सरासरीपेक्षा ५ ते ८ अंशांच्या वर आहे. ४२.२ अंशांसह चंद्रपूर सर्वाधिक उष्ण आहे. बुलढाणा, वाशिम, यवतमाळ वगळता इतर जिल्ह्यांत पारा ४० अंशांच्या वर नोंदविण्यात आला.

मान्सूनपूर्व हालचाली कमजोर

वातावरणात आर्द्रतेचा स्तर कमी असल्याने मान्सूनपूर्व हालचाली कमजोर पडल्या आहेत. सध्या आर्द्रतेचा स्तर ५० टक्क्यांवर असून सायंकाळी तो ३० टक्क्यांपर्यंत खाली येतो. त्यामुळे रात्रीही उष्ण वाऱ्याचा प्रभाव जाणवतो. यामुळेच मंगळवारी रात्रीचा पारा २९.४ अंश नोंदविण्यात आला, जो सरासरीपेक्षा ४ अंशांनी अधिक आहे. त्यामुळे रात्रीही उकाड्याचा त्रास जाणवतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here