अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी
नळावरील मीटर काढल्यास अथवा टिल्लू पंप लावला असल्याचे आढळल्यास मनपाच्या जप्ती पथकांद्वारे कारवाई
चंद्रपूर :- चंद्रपूर शहरातील सर्व नळ जोडणींवर मनपाद्वारे मीटर लावण्यात आले आहेत. मात्र, काही नागरिक मीटरला लागून असलेला पाईप काढून टाकतात, ज्यामुळे पाण्याचा वापर करताना मीटर बंद असतो व बिल अतिशय कमी येते. या गैरप्रकारावर नियंत्रण करण्यासाठी मनपातर्फे कारवाई सुरू करण्यात आली आहे.
टिल्लू पंप लावणाऱ्यांविरूद्ध कारवाई
नळावरील मीटर काढल्यास अथवा विद्युत पंप / टिल्लू पंप लावला असल्याचे आढळल्यास मनपाच्या जप्ती पथकांद्वारे कारवाई केली जात आहे. तीन नळ जोडणीधारकांवर चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत जप्तीची कारवाई करण्यात आली असून त्यांचे नळ कनेक्शन खंडीत करून दंड ठोठाविण्यात आला आहे. दंड न भरल्यास सदर नळजोडणी धारकांना काळ्या यादीत टाकल्या जाणार आहे.
मनपातर्फे शहरातील सर्व नळ जोडणीवर जलमापक (मीटर) लावण्यात आले असुन जानेवारी महिन्यापासुन मीटरचा प्रत्यक्ष वापर सुरु आहे. वैद्य नगर येथील शिवकृपा फर्निचर जवळील रहिवासी किशोर विठ्ठलराव रिधे, राजेश बागेल व सुरेश नत्थुजी इंगळे यांच्याद्वारे नळ जोडणीवर लावलेले जलमापक (मीटर) काढुन टाकणे तसेच टिल्लू पंप लावुन पाण्याचा अनावश्यक उपसा केला जात असल्याचे मनपा पथकास पाहणी दरम्यान आढळून आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून जप्ती करण्यात आली आहे.