चंद्रपूर जिल्ह्यात पालकमंत्रीपदावर शर्यत: कोण होणार? संपूर्ण राज्यभर चर्चा सुरू, चंद्रपूर जिल्ह्यात उत्सुकता वाढली आहे.
चंद्रपूर :- अतुल दिघाडे
2024 विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी (BJP) आणि मित्रपक्षांच्या महायुतीने मोठा विजय मिळवला आहे. महायुतीला 230 जागा मिळाल्या असून, भाजपला 132, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 57 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या आहेत. यानंतर आता राज्यात महायुतीचे सरकार स्थापनेसाठी प्रक्रिया सुरु झाली आहे, आणि चंद्रपूर जिल्ह्यात पालकमंत्रीपदावर कोण येणार, यावर चर्चेचा बाजार तापला आहे.
चंद्रपूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी महायुतीच्या 5 आमदारांपैकी 3 प्रमुख आमदारांची नावे चर्चेत आहेत. मंत्री सुधीर मुनगंटीवार, ज्यांनी सातव्या निवडणुकीत विजय मिळवला, त्यांना विधानसभा अध्यक्ष करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर ते विधानसभा अध्यक्ष झाले, तर चिमूरचे आमदार बंटी भांगडिया यांना चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री केले जाऊ शकतात. ते भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात.
तसेच, चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार, ज्यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये विविध राजकीय पक्षांसोबत चांगले संबंध ठेवले आहेत, त्यांचीही पालकमंत्रीपदासाठी दावेदारी असल्याचे सांगितले जात आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत, त्यामुळे त्यांना देखील पालकमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.
वरोराचे आमदार करण देवतळे आणि राजुराचे आमदार देवराव भोंगळे यांची ही पहिलीच टर्म असली तरी भाजपच्या परंपरेनुसार नवनिर्वाचित आमदारांना मोठ्या पदावर संधी दिली जात असल्यामुळे त्यांना देखील पालकमंत्री बनवले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.तथापि, सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभा अध्यक्ष न बनवले तर, चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद त्यांच्या कडेच जाईल, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यात पालकमंत्रीपदाच्या दावेदारांबाबत विविध चर्चांचे धागे वळत आहेत, आणि या मुद्द्यावरील अंतिम निर्णय लवकरच घेण्यात येईल असे चित्र आहे.