व्यापारी महिलेची हत्या: आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचारी नरेश डाहुले याला अटक
चंद्रपूर :- (10 डिसेंबर): चंद्रपूर जिल्ह्यात एका बडतर्फ पोलीस कर्मचारी नरेश डाहुलेने व्यापारी महिलेची हत्या केली. या धक्कादायक घटनेमुळे पोलीस विभागाच्या कामकाजावर एक प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
Nwes reporter :- अतुल दिघाडे
26 नोव्हेंबर 2023 रोजी देवांश जनरल स्टोर्सच्या संचालिका अरुणा अभय काकडे हे नागपुरातील इतवारी मार्केटमध्ये सामान खरेदी करण्यासाठी गेले होते, पण त्यानंतर त्यांचा काही थांगपत्ता लागला नाही. कुटुंबीयांनी त्वरित पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग तक्रार दाखल केली, परंतु सुरूवातीला त्यांचा शोध घेण्यात पोलीसांना यश आले नाही.
अरुणा काकडे चिमूर व्यापारी संघटनेच्या सदस्याही होत्या, ज्यामुळे या प्रकरणाचा तपास चंद्रपूर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांद्वारे केला गेला. पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या तपास करीत अरुणाच्या कॉल रेकॉर्ड्स तपासले, ज्यात बडतर्फ पोलीस कर्मचारी नरेश डाहुले यांचा नंबर आढळला.
चंद्रपूर पोलिसांनी डाहुलेला ताब्यात घेतल्यावर त्याने पोलीस चौकशीत उघड केले की 26 नोव्हेंबर रोजी अरुणा काकडे ही त्याची वर्गमैत्रिण होती, आणि त्या दिवशी ती त्याच्यासोबत होती. दोघांमध्ये रेशीमबाग मैदानावर वाद झाला, आणि रागाच्या भरात त्याने अरुणाचा गळा आवळून खून केला. नंतर त्याने तिचा मृतदेह बेसा येथील निर्जन स्थळी असलेल्या शौचालयाच्या टाक्यात टाकला.
यापूर्वी 2023 मध्ये डाहुलेने चंद्रपूर शहरातील विविध भागात घरफोडीच्या गुन्ह्यात सहभाग घेतला होता, ज्याचा तपास रामनगर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक हर्षल एकरे करत होते. त्यावेळी डाहुलेला अटक करण्यात आली होती, आणि त्याला पोलीस विभागाने बडतर्फ केले होते. पण, आता हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यात अटक झाल्याने चंद्रपूर पोलिस विभागाची प्रतिष्ठा पुन्हा एकदा डगमगली आहे.
आयपीएल सट्टा आणि शेअर मार्केटमध्ये होणाऱ्या आर्थिक अडचणींमुळे डाहुलेने चोरी आणि घरफोडी करण्यास सुरुवात केली होती, आणि त्याचे कर्ज उचलणे त्याच्या गुन्हेगारी कारकीर्दीची सुरुवात ठरले. आज पुन्हा एकदा त्याच्या हत्येच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे, ज्यामुळे पोलिस विभागाची मोठी नाचक्की झाली आहे.
चंद्रपूर शहरातील या धक्कादायक घडामोडीने स्थानिक नागरिक आणि व्यापारी वर्गात आश्चर्याचा आणि संतापाचा वातावरण निर्माण केला आहे.