Home चंद्रपूर आश्चर्यजनक :- मेड इन चंद्रपूर, मेडी -रोवर रोबोट कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभागी...

आश्चर्यजनक :- मेड इन चंद्रपूर, मेडी -रोवर रोबोट कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभागी !

आजपासून रोबोट करणार चंद्रपुरातील रुग्णांची सेवा !

चंद्रपूर प्रतिनिधी :-

कोरोना विरुद्धच्या लढ्यात डॉक्टरांच्या मदतीसाठी जिल्ह्यात टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेडने बनवलेला आधुनिक मेडी-रोवर रोबोट आजपासून  जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांच्या सेवेत दाखल होणार आहे. काल  जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात तयार झालेला हा रोबोट जिल्हा आरोग्य यंत्रणेला सुपूर्द केला.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी असे सांगितले की, कोरोना रुग्णांची सुश्रुषा करण्यासाठी हा रोबोट सध्या मदत करणार असून भविष्यात यामध्ये काही सुधारणा करून नमुने तपासणीसाठी मदत करता येणार आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्याने होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. यातच आता मेडी- रोवर नामक रोबोट कोरोना रुग्णांची‌ सुश्रुषा करण्यासाठी मदत करणार आहे. मेडी-रोवर रोबोटचा प्रमुख उद्देश रुग्ण आणि वैद्यकीय कर्मचारी यांचा कमीत कमी संपर्क यावा हा आहे.
टाटा टेक्नॉलॉजीचे प्रोजेक्ट मॅनेजर मनीष कुमार, यांत्रिकी अभियंता जीवन काळे, दानिश पठाण व त्यांच्या चमूने मेडी-रोवर हा रोबोट चंद्रपूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील सीआयआयटी प्रयोग शाळेअंतर्गत तयार केला आहे. यासाठी विशेष मार्गदर्शन बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील यांनी दिले होते.
हि आहे मेडी-रोवरची विशेषतः
हा रोबोट वायरलेस असून बॅटरी ऑपरेटेड आहे. याची वाहक क्षमता 30 किलो आहे. या रोबोटला 10 मीटर पर्यंत ऑपरेट करता येऊ शकतो. तसेच रुग्णांना खाण्यापिण्याचे सामान, मेडिसिन, उपयुक्त सोयीसुविधा पुरवण्यासाठी हा रोबोट मदत करणार आहे. हा रोबोट सहज हाताळता येणार आहे.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील, वरीष्ठ वन अधिकारी कुलराज सिंग , यांत्रिकी अभियंता जीवन काळे, दानिश पठाण उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here