Home चंद्रपूर अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारी “ती” वाघनखे 19 जुलैला येणार स्वराज्यभूमीत! सांस्कृतिक कार्यमंत्री...

अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारी “ती” वाघनखे 19 जुलैला येणार स्वराज्यभूमीत! सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या वचनपूर्ती बद्दल शिवप्रेमींमध्ये उत्साह

साताऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रमासह प्रदर्शनासाठी संग्रहालयात ठेवणार

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर

मुंबई, दि. १७ : स्वराज्याचा शत्रू असलेल्या अफजलखानाचा प्रतापगडाच्या पायथ्याशी कोथळा बाहेर काढणारी छत्रपती शिवाजी महाराजांची “ती वाघनखे” अखेर 19 जुलैला स्वराज्यभूमीत येणार आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात समाजाच्या तळागळातील प्रश्नांची जाण असलेल्या व अभ्यासू पद्धतीने ते प्रश्न संसदीय पटलावर मांडणाऱ्या विधिमंडळात दिलेला शब्द पूर्ण करणाऱ्या सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची “ती” वाघनखे लंडनहुन भारतात आणि स्वराज्यात अर्थात महाराष्ट्रात आणण्याचा दिलेला शब्द पूर्ण केला आहे. ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या या प्रामाणिक प्रयत्नांचे राज्यातील शेकडो शिवप्रेमी संस्था लाखो शिवप्रेमींकडून स्वागत केले जात आहे.

“देव, देश आणि धर्मासाठी लढून स्वराज्य हितासाठी लढणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही दैवत मानतो; छत्रपती शिवाजी महाराज या नावातच ऊर्जा आहे, बळ आहे शक्ती आहे; याच शक्तीने बलाढ्य योद्धा असलेल्या अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला. हा इतिहास रोमांच उभा करणार आहे आणि महाराष्ट्रातील पिढ्यानपिढ्या शौर्यवान व बलवान करणारा आहे. म्हणूनच ही वाघनखे स्वराज्य भूमीत आणण्याचा संकल्प मी केला होता आणि तो पूर्ण होतोय याचे मला समाधान असून, रयतेचे राज्य ही महाराजांची संकल्पना साकार करणारे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस व श्री. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात हे शक्य झाले” अशी भावना राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ना. श्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. लंडन येथील विक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयातून वाघ नखे तीन वर्षांसाठी भारतात येणार असून 19 जुलै पासून सातारा येथे संग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत.
राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून ना. मुनगंटीवार यांनी पदभार सांभाळल्यानंतर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त विविध अभिनव उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला, आणि अभिनव उपक्रम यशस्वीरित्या राबविले.

बऱ्याच वर्षापासून प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखानाच्या कबरीच्या ठिकाणी झालेले अतिक्रमण दिनांक १० नोव्हेंबर २०२२ रोजी वन विभागामार्फत हटविण्याचा मोठा निर्णय ना. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला.
यानंतर दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रोजी आग्रा येथील औरंगजेबाच्या “त्या” दिवाण ए खास या महालामध्ये शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला, जेथे *महाराजांचा* अपमान औरंगजेबाने केला होता. याही वर्षी उत्साहात तेथे शिवजयंती साजरी करण्यात आली.
सन २०२३ च्या रायगड येथील शिवराज्याभिषेकाच्या सोहळ्यासाठी देशभरातील विविध ठिकाणचे पवित्र जल एकत्र करून सहस्त्रजलकलश यात्रा दिनांक २६ मे २०२३ रोजी राजभवन येथून सुरू करण्यात आली व या जलाद्वारे रायगड येथे दिनांक २ जून २०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या वेळी जलाभिषेक करण्यात आला.
दिनांक १ जून २०२३ रोजी गेट वे ऑफ इंडिया, मुंबई येथे राज्य शासनाच्या पुरातत्त्व विभागामार्फत शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन सांस्कृतिक कार्य विभागाकडून भरविण्यात आले होते.
३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागामार्फत विशेष लोगोचे प्रसारण करून या लोगोचा वापर राज्य शासनामार्फत करण्यात येत आहे. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत यावर्षी किल्ले रायगड येथे दिनांक २ जून २०२३ रोजी तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा जल्लोषात साजरा करण्यात आला. यावर्षीपासून हा सोहळा दर वर्षी शासनाकडून साजरा करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
दिनांक ६ जून २०२३ रोजी शिवराज्याभिषेक वर्षाच्या निमित्ताने “शिवकालीन होन” या विशेष टपाल तिकिटाचे राजभवन मुंबई येथे अनावरण करण्यात आले. ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून मंत्रालयात सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली द्वारे दररोज सकाळी शिवविचार प्रसारणास दिनांक १८ ऑगस्ट २०२३ पासून सुरुवात झाली. तेव्हापासून मंत्रालयात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दररोज सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी एक शिवविचार सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना ऐकवण्यात येतो.
छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील श्री शहाजीराजे यांच्या वरील विशेष टपाल तिकिटाचे अनावरण दिनांक १८ ऑगस्ट २०२३ रोजी मंत्रालयात करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या वधासाठी वापरलेली वाघनखे सध्या लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम मध्ये आहेत. ती वाघनखे भारतात आणण्याच्या सामंजस्य करारावर दिनांक ३ ऑक्टोबर २०२३ रोजी स्वाक्षरी करण्यात आली.
जम्मू काश्मीर मधील कुपवाडा येथे भारतीय आर्मीच्या बेसवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आम्ही पुणेकर या संस्थेच्या पुढाकारातून दिनांक ७ नोव्हेंबर २०२३ रोजी बसविण्यात आला.
दिनांक १२ जानेवारी २०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री मासाहेब जिजाऊ यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांचे जन्मस्थळ सिंदखेडराजा, जिल्हा बुलढाणा येथे विशेष टपाल तिकिटाचे अनावरण ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्याचे प्रयोग प्रत्येक जिल्ह्यात करण्यात येत आहेत. याचा शुभारंभ दिनांक १३ जानेवारी २०२४ रोजी नागपूर येथे करण्यात आला. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये जाणता राज्याचे प्रयोग शिवप्रेमी जनतेसाठी मोफत दाखविण्यात आले.
७ मार्च २०२४ रोजी चंद्रपूर येथील प्रियदर्शनी सभागृहात स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी राजे यांच्या वरील टपाल तिकिटाचे अनावरण ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले ; त्याचवेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दुर्मिळ पत्रांच्या पुस्तकाचे विमोचन आणि दृष्टीबाधित दिव्यांगजनांसाठी ब्रेल लिपी मधून शिवचरित्र प्रकाशित करण्यात आले.
“मराठा साम्राज्याचे चलन” या विषयासंदर्भात जनजागृती साठी एकदिवशीय शिबिर महाराष्ट्र राज्यात 12 ठिकाणी घेण्याचा निर्णय ना. मुनगंटीवार यांच्या नेतृत्वातच शासनाने घेतला. शिवकालीन शस्त्र “दांडपट्टा” ला राज्यशास्त्र म्हणून दर्जा देण्याचा निर्णय देखील ना. मुनगंटीवार यांनी घेतला.
राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान असणाऱ्या सिंदखेड राजा येथील मूलभूत सुविधा करता 50 कोटी रुपये देण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्य मंत्र्यांनी याच कार्यकाळात घेतला.
पन्हाळगड ते विशाळगड या मोहीम मार्गावर निवासाची सोय करण्यासाठी 15 कोटी रुपये यावर्षी उपलब्ध करून देण्यात आले असून रायगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या पाचाड या ठिकाणी शिवसृष्टी उभारणीसाठी 50 कोटी रुपये एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. विशेष म्हणजे याच कार्यकाळात मराठा लष्कर स्थापत्यास युनेस्कोच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात महाराष्ट्र शासनाला यश आले आहे.
महाराष्ट्र राज्याचे वित्त व नियोजन मंत्री असताना श्री शिवाजी मेमोरियल कमिटी, श्रीशैल्यम, आंध्र प्रदेश यांच्या मागणीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचे श्रीशैल्यम येथे ध्यानमंदिर बांधण्यासाठी रुपये ३ कोटी ३८ लाख एवढी आर्थिक मदत महाराष्ट्र शासनामार्फत करण्यात आली होती.
रयतेसाठी कल्याणकारी राज्य निर्माण करण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा संकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सरकारने घेतला असून त्या दृष्टीने सकारात्मक पावले उचलली जात आहेत असेही ना. सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here