निधी दिला, आता महिन्याभरात काम पूर्ण करा – आ. किशोर जोरगेवार
बाबूपेठ उड्डाण पुलाच्या कामाची पाहणी, बाबूपेठकरांनी मानले आभार
राजेंद्र मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर:-बाबूपेठ उड्डाणपूलाच्या बांधकामात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आपण वेळोवेळी प्रयत्न केले. शेवटच्या टप्यातील काम निधीअभावी रखडल्याचे लक्षात येताच आपण ५ कोटी ४९ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. आता युद्धपातळीवर काम करून महिन्याभरात काम पूर्ण करत उड्डाणपुल नागरिकांसाठी सुरू करा असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
आज बुधवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांसह बाबूपेठ उड्डाणपुलाची पाहणी केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश तांगडे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, मनपा शहर अभियंता विजय बोरिकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप विभागीय अभियंता विवेक अंबुले यांच्यासह रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
बाबूपेठ उड्डाणपूल चंद्रपूरातील प्रमुख समस्यांपैकी एक समस्या होती. हा पूल व्हावा यासाठी बाबूपेठ वासीयांच्या वतीने अनेक आंदोलने करण्यात आली. दर पाच मिनिटाला येथील रेल्वेगेट बंद होतो. येथून मध्य रेल्वे लाईन आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वे लाईन आहे. परिणामी दोन्ही गेट बंद राहत असल्याने नागरिकांना तासंतास येथे उभे राहावे लागत होते. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष होता.
ही बाब लक्षात घेता येथे रेल्वे उड्डाण पूल तयार करण्याच्या दिशेने आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रयत्न सुरू केले होते. मात्र अनेक तांत्रिक अडचणींमध्ये हा पूल अडकला. अखेर पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले. मात्र रेल्वे विभागाच्या तिसऱ्या रुळाच्या कामासाठी पुन्हा या पुलाचे काम मंदावले होते. त्यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी सातत्याने प्रयत्न करत सदर पुलाच्या कामाला गती दिली. मात्र पुलाचे काम अंतिम टप्प्यात असताना निधीअभावी सदर काम पुन्हा एकदा रखडले होते.
यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा अधिकाऱ्यांची बैठक घेत सदर कामाला लागणारा ५ कोटी ४९ लाख रुपयांचा निधी देणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर त्यांनी सदर निधी मंजूर करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू केला होता. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले. काल बुधवारी सदर कामासाठी नगर विकास विभागाच्या वतीने ५ कोटी ४९ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली. दरम्यान, आज आमदार किशोर जोरगेवार मुंबईहून थेट बाबूपेठ उड्डाण पुलाच्या पाहणीसाठी चंद्रपूरात दाखल झाले. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह बांधकामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी सदर कामासाठी आपण निधी उपलब्ध करून दिला आहे. आता येथील कामाला गती देण्यात यावी, युद्धपातळीवर हे काम पूर्ण करून महिन्याभरात सदर पुल नागरिकांच्या सेवेत सुरू करावा असे निर्देश अधिकार्यांना दिले आहे, यावेळी निधी मंजूर केल्याबद्दल बाबूपेठ येथील नागरिकांनी पुष्पगुच्छ देऊन आमदार किशोर जोरगेवार यांचे आभार मानले. याप्रसंगी शेकडो बाबूपेठ वासीयांची उपस्थिती होती.