Home चंद्रपूर लक्षवेध :- निवडणुकीत विजयी रथ सतत सुरु ठेवणारे विजय वडेट्टीवार राजकीय क्षेत्रातील...

लक्षवेध :- निवडणुकीत विजयी रथ सतत सुरु ठेवणारे विजय वडेट्टीवार राजकीय क्षेत्रातील तरुणांचे आयकॉन.

मोदी लाटेतही ज्यांनी जिंकणे सोडले नाही ते हरणार कसे? कांग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची प्रभावशाली राजकीय वाटचाल.

लक्षवेध :-

देशात आणि राज्यात ज्या पद्धतीचं राजकारणं चाललंय हे अत्यंत घाणेरड आणि विचित्र आहे, त्यामुळे नव्याने राजकारणात येणाऱ्या तरुणांपुढे मोठे आव्हान उभे आहे, पक्षीय राजकारणात केवळ सत्ताधारी यांचीच चलती आहे तर विरोधात सगळ्यांचा सुपडासाफ होण्याची भीती आहे, पण अशाही राजकीय विपरीत परिस्थितीत आपल्या प्रचंड इच्छाशक्ती व परिश्रमाने विजयाचा रथ सतत सुरु ठेवणारे विजय वडेट्टीवार हे खऱ्या अर्थाने राजकीय योद्धे आहे हे म्हणावे लागेल, कारण अगदी विद्यार्थी दसेपासून त्यांनी राजकीय यश मिळवत राज्याच्या राजकारणात उंच भरारी घेतली आहे त्यामुळे राजकारणातील तरुणांचे ते राजकीय आयकॉन बनले आहे, जिथे मोदी लाटेत भल्याभल्याचा सुपडासाफ झाला तिथे मोदीची सभा होऊन सुद्धा मोठ्या फरकाने विजय प्राप्त करून आपलं राजकीय कौशल्य दाखवून देणारे विजय वडेट्टीवार राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांना नक्कीच प्रेरणा देणारे राजकीय नेते ठरले आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे आणि अशा प्रसंगी त्यांच्या प्रभावाषाली राजकीय वाटचालीचा वेध घेणं हे महत्वाचं आहे आणि म्हणून अशा राजकीय योद्धाला पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देऊन तरुणांना त्यांच्यापासून राजकीय ऊर्जा मिळावी म्हणून हा लिहिण्याचा प्रपंच (लक्षवेध)

चंद्रपुर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील करंजी येथे 1962 साली जन्मलेल्या विजय वडेट्टीवारांची राजकीय वाटचाल सुरू झाली ती अगदी महाविद्यालयीन दिवसांपासून. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून आलेल्या विजय वडेट्टीवारांनी एनएयूआयच्या माध्यमातून विद्यार्थी आंदोलनांमध्ये सहभाग घेतला. हा काळ 1980-81 चा होता. राजकीय वाटचालीत चंद्रपूर, महाविद्यालयीन काळात काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेतून आंदोलनं केली असली, तरी पुढे त्यांनी शिवसेनेच्या झेंडा खांद्यावर घेतला आणि चंद्रपूर जिल्ह्यात विविध आंदोलनं त्यांनी केली.

1991 ते 1993 दरम्यान ते गडचिरोली जिल्हा परिषदेचे नामनियुक्त सदस्य बनले. पुढे राज्यात शिवसेना-भाजप युतीचं सरकार असताना, 1996 ते 1998 दरम्यान वडेट्टीवारांकडे महाराष्ट्र वन विकास महामंडळाचं अध्यक्षपद देण्यात आलं. या पदाला राज्यमंत्री दर्जा होता. वडेट्टीवारांच्या राजकीय कारकीर्दीतलं हे पहिलं राज्यव्यापी पद होय. पुढे 1998 साली त्यांना शिवसेनेनं विधानपरिषदेची आमदारकी दिली आणि पहिल्यांदा ते विधिमंडळाची पायरी चढले. नंतर 2004 साली ते पहिल्यांदा शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरले. चंद्रपूरच्या चिमूर मतदारसंघातून त्यांनी विधानसभा निवडणूक जिंकली आणि आमदार बनले.

दरम्यान 2005 साली शिवसेनेत माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी बंड केलं. नारायण राणेंच्या समर्थनार्थ उभे राहिलेल्या 11 आमदारांमध्ये विजय वडेट्टीवार हेही होते. तेंव्हा आमदारकीचा राजीनामा देऊन नव्याने निवडणूक लढवून आमदार बनण्याच्या नादात 11 पैकी काही आमदार पडले मात्र ज्यांच्या नावातच विजय आहे ते विजय वडेट्टीवार मात्र कांग्रेस च्या अंतर्गत असलेल्या प्रचंड विरोधाला सामोरे जातांना सुद्धा पुन्हा निवडून आले पुढे 2008 साली विजय वडेट्टीवारांना जलसंपदा, आदिवासी विकास आणि पर्यावरण वने या खात्यांचं राज्यमंत्रिपद मिळालं. मात्र, हे पद एकच वर्षे सांभाळता आलं. कारण वर्षभरात विधानसभा निवडणुका झाल्या आणि ते पुन्हा एकदा चिमूर मतदारसंघातून निवडून आले.त्यानंतर म्हणजे 2009 साली जलसंपदा, ऊर्जा, वित्त व नियोजन आणि संसदीय कार्य या खात्यांचं राज्यमंत्रिपद वडेट्टीवारांकडे आलं.

2014 साली काँग्रेसची सत्ता गेली, मात्र वडेट्टीवार काँग्रेससोबतच राहिले. विधानसभेत त्यांच्याकडे उपनेतेपद आलं. पुढे राधाकृष्ण विखे-पाटील विरोधी पक्षनेतेपदी असतानाच, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं, रिक्त झालेल्या विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची निवड करण्यात आली. आता सुद्धा त्यांच्याकडे विरोधी पक्ष नेते पद होतं पण यावेळी महाविकास आघाडीचा राज्यात सुपडासाफ झाला असतांना व कांग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पाटोले हे केवळ 205 मतांनी निवडून आले तरी विजय वडेट्टीवार यांनी विधानसभा निवडणुकीत चालवलेला विजयी रथ मात्र सुरूच ठेवला त्यामुळे त्यांना पक्षाच्या संघटनेची जबाबदारी मिळू शकते कारण कांग्रेसला नवसंजीवनी द्यायची असेल तर आक्रमक नेतृत्व हवं आणि त्यात विजय वडेट्टीवार यांच्यासारखा दुसरा नेता कांग्रेसकडे नाही ही वस्तुस्थिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here