“सुधीर मुनगंटीवार यांचे अनुभवदायी नेतृत्व म्हणजे आमदारांसाठी दिशादर्शक दीपस्तंभ” – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा गौरवोच्चार
मुंबई, दि. १२ जुलै २०२५ – मोटर वाहन (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक 2025 नुकतेच राज्य विधानसभेत सादर करण्यात आले. या ऐतिहासिक विधेयकाच्या मांडणीनंतर सभागृहात विशेष क्षण घडला, जेव्हा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आदरणीय आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे नाव गौरवाने घेत त्यांचे विशेष अभिनंदन आणि मन:पूर्वक आभार व्यक्त केले.
News reporter :- अतुल दिघाडे
सुधीरभाऊंनी सभागृहात सादर केलेले विधेयक हे केवळ कायदेशीर बाबींचे संकलन नसून, राज्यातील वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा, वाहनधारकांच्या सुविधा, तसेच अपघातग्रस्तांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने एक दूरदृष्टीपूर्ण पाऊल आहे, असे प्रताप सरनाईक यांनी आपल्या भावनिक भाषणात नमूद केले.
“परिवहन मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्यापासून मी सुधीरभाऊंना वेळोवेळी सांगत आलो आहे की, त्यांच्या अनुभवाचे आणि मार्गदर्शनाचे योगदान आमच्यासाठी अत्यंत मौल्यवान आहे,” असे सरनाईक म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, “गेल्या २० वर्षांपासून मी सभागृहाचा सदस्य आहे आणि या काळात सुधीरभाऊंच्या प्रत्येक भाषणातून मला शिकायला मिळाले आहे. त्यांच्या सुसंस्कृत आणि अभ्यासपूर्ण दृष्टिकोनामुळेच त्यांचे कार्य हे नवोदित व जुन्या आमदारांसाठीही प्रेरणादायी ठरते.”
सरनाईक यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की, “जर कोणत्याही आमदाराने सुधीरभाऊंच्या भाषणाकडे आणि कार्यपद्धतीकडे लक्ष दिले, तर त्या आमदाराची किमान एक तरी टर्म निश्चितपणे वाढू शकते. ही केवळ माझी भावना नाही, तर माझ्या दोन दशकांच्या राजकीय अनुभवातून सिध्द झालेली वस्तुस्थिती आहे.”
सुधीर मुनगंटीवार यांच्याबाबतचे हे गौरवोद्गार केवळ एक मंत्री म्हणून नाही, तर एका सहकाऱ्याच्या नात्याने व्यक्त करण्यात आलेले आहेत. या विधेयकाच्या निमित्ताने, सभागृहात अनुभव आणि नवचैतन्य यांचे एकत्रित प्रतिबिंब पाहायला मिळाले.
राजकारणात मतभेद असले, तरी विचारांचा सन्मान आणि प्रेरणेचा स्वीकार कसा करावा, हे प्रताप सरनाईक यांच्या या भाषणातून उलगडते. आणि त्याचबरोबर सुधीर मुनगंटीवार यांचं कार्य हे केवळ विदर्भापुरतं मर्यादित न राहता, संपूर्ण महाराष्ट्रासाठी मार्गदर्शक ठरतंय, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.