संतुलित आहार आणि शिस्तबद्ध जीवनशैलीच विद्यार्थ्यांचे भविष्य घडवते – डॉ. अनुप पालीवाल
छोटूभाई पटेल हायस्कूल माजी विद्यार्थी संघाच्या वतीने “विकसित विद्यार्थी – सक्षम राष्ट्र” व्याख्यानमालेस उत्स्फूर्त प्रतिसाद
चंद्रपूर, दि. २७ जुलै २०२५ :- विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानापुरतेच मर्यादित न राहता आरोग्याचीही काळजी घेणे तितकेच आवश्यक आहे. संतुलित आहार, नियमित व्यायाम, मैदानी खेळ आणि मोबाईलपासून दूर राहणे हे निरोगी जीवनाचे मूलमंत्र आहेत, असे प्रतिपादन प्रसिद्ध बालरोगतज्ञ व शल्यचिकित्सक डॉ. अनुप पालीवाल* यांनी केले.
News reporter :- अतुल दिघाडे
छोटूभाई पटेल हायस्कूल माजी विद्यार्थी संघ आयोजित स्व. स्वप्नील महावादीवार स्मृती प्रित्यर्थ “विकसित विद्यार्थी – सक्षम राष्ट्र” या व्याख्यानमालेमध्ये डॉ. पालीवाल प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्व. छोटुभाई पटेल यांच्या तैलचित्राला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पणाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांना उद्देशून मार्गदर्शन करताना डॉ. पालीवाल म्हणाले की, “सध्याच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांचे फास्ट फूड आणि मोबाईलकडे वाढते झुकाव चिंताजनक आहे. हे शरीरावर व मनावर घातक परिणाम करत आहे. त्यामुळे आहारात प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करावा, मैदानी खेळ खेळावेत आणि पुरेशी झोप घ्यावी.”
डॉ. पराग जवळे यांचा प्रेरणादायी संदेश :
कार्यक्रमाचे विशेष पाहुणे आणि गोंडपिपरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पराग जवळे यांनी विद्यार्थ्यांना आदर्श जीवनशैलीचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले, “उपचारांपेक्षा प्रतिबंध अधिक चांगला. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सकस आहार, स्वच्छता, नियमित व्यायाम, आणि सकारात्मक मानसिकता अत्यावश्यक आहे. पावसाळ्यात उघड्यावरचे अन्न खाणे टाळावे आणि पालेभाज्यांचा आहारात समावेश करावा. विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक विकासाचं समीकरण राष्ट्रनिर्मितीशी जोडलेलं आहे.”
कार्यक्रमात उपस्थित मान्यवर :
या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कांत (वैद्य) मॅडम, उपमुख्याध्यापक मानकर सर, निबांळकर सर, कुंमरे मॅडम माजी विद्यार्थी तथा अधिकारी डॉ. पराग जवळे, तसेच संघाचे सदस्य जितेंद्र मशारकर, धीरज साळुंके, सागर कुंदोजवार यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रभावी संचालन व आभार प्रदर्शन बम सर यांनी केले. या यशस्वी उपक्रमासाठी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि माजी विद्यार्थी संघाच्या सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.
—