Home चंद्रपूर कृषी वार्ता :-पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते युरीया रॅकचे उद्घाटन.

कृषी वार्ता :-पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते युरीया रॅकचे उद्घाटन.

चंद्रपूर जिल्ह्यात 2800 मेट्रीक टन ‘भारत युरीया’ मिळाला. शेतकऱ्यांना मिळणार एका बॅगवर 1971 रुपये सबसीडी.

चंद्रपूर, प्रतिनिधी :-

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्स, मुंबईकडून 2800 मेट्रीक टन भारत युरिया जिल्ह्यात प्रथमच रॅकद्वारे प्राप्त झाला आहे. चंद्रपूर रेल्वे स्थानकावरील सदर रॅकचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले असून युरियाचे वितरण सुरू झाले आहे. विशेष म्हणजे  एम.आर.पी. आणि सबसीडी मिळून एका बॅगची किंमत 2237 रुपये आहे. शेतक-यांना मात्र एक बॅग एम.आर.पी. किंमतीनुसार 266.50 रुपयांना मिळणार असून एका बॅगवर तब्बल 1971 रुपयांची सबसीडी देण्यात आली आहे.

चंद्रपूर येथील मालधक्क्यावर आयोजित या कार्यक्रमाला जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, कृषी विकास अधिकारी लक्ष्मीनारायण दोडके, मोहिम अधिकारी सुशांत गाडेवार, आर.सी.एफ कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक श्री. पानझडे, व्ही. सी. एम. एफचे जिल्हा व्यवस्थापक श्री. हानोळे आदी उपस्थित होते.

मालधक्यावरील मजुरांशी संवाद साधतांना पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, येथील रॅक पॉईंटचे सिमेंटीकरण करून आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. यात शेड, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आदींचा समावेश असून मजुरांच्या समस्यांबाबत रेल्वे विभागाने त्वरीत प्रस्ताव सादर करावा. पुढील चार – पाच महिन्यात सर्व सोयीसुविधा मंजुरांसाठी येथे उपलब्ध झाल्या पाहिजे, अशा सुचना त्यांनी रेल्वे विभागाला दिल्या.

चंद्रपूर जिल्ह्यात रब्बी हंगामात 1 लक्ष 18 हजार 949 हेक्टर पेरणी झाली आहे. यात गहू 16,335.80 हे., हरभरा 62,372 हे., ज्वारी 6432.90 हे., मका 1291.30 हे., मुंग 2195.10 हे., उडीद 1757.40 हे., जवस 1284.80 हे., तीळ 8.20 हे., करडी 911 हे., मोहरी 182.90 हे., सोयाबीन 2695.40 हे. सूर्यफूल 8 हेक्टरवर आहे. सद्यस्थितीत जिल्हयात पिकांच्या गरजेनुसार मुबलक रासायनिक खतसाठा उपलब्ध आहे. परंतू, शेतकरी बांधवानी रासायनिक खताचा अतिरिक्त वापर न करता पिकांच्या गरजेनुसारच रासायनिक खताचा संतुलित वापर करावा. तसेच युरिया खताचा जास्त वापर झाल्यास पिकांच्या उत्पादकतेत घट येण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात सद्यपरिस्थितीत गहू या पिकाला विद्यापीठाच्या रासायनिक खताच्या मात्रेनुसार युरिया खत देण्यात यावे. परंतु, हरभरा हे पीक घाटे धारण करण्याच्या स्थितीत असल्यामुळे त्यास नत्राची आवश्यकता नाही. आजच्या परिस्थितीत हरभरा या पिकास युरिया दिल्यास पिकाची काईक (शाखा व पानांची) वाढ होऊन त्यामुळे अंदाजे 20 ते 25 टक्क्यांनी उत्पन्नात घट येऊ शकते. याकरीता सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की, गव्हा व्यतिरिक्त इतर पिकांना युरिया देण्याची आवशकता नाही.

रब्बी हंगाम 2022-23 साठी नत्र, स्फुरद व पालाश या मुलद्रव्यांचा विचार करून एकूण 56 हजार 497 मे. टन रासायनिक खताची मागणी कृषी आयुक्तालय, पुणे यांच्याकडे सादर केल्यानुसार कृषी आयुक्तालयाकडून 41 हजार 970 मे.टन रासायनिक खताचे आंवटन मंजूर केले आहे. यामध्ये युरिया 21 हजार 970 मे.टन, डीएपी 1 हजार 620 मे. टन, एसएसपी 8 हजार 250 मे. टन, एम.ओ.पी. 500 मे. टन, संयुक्त खते 9 हजार 630 मे. टनचा समावेश आहे. या आवंटनाप्रमाणे 58 हजार 815.40 मे. टन रासायनिक खतसाठा रब्बी हंगाम 2023 साठी उपलब्ध झाला आहे. यामध्ये युरिया 21 हजार 125मे.टन, डि.ए.पी. 2 हजार 896.35 मे.टन, एस.एस.पी. 19 हजार 465 मे. टन, एम.ओ.पी. 133मे.टन, संयुक्त खते 13 हजार 905मे. टन, मिश्रखते 1 हजार 291 मे. टन प्राप्त झाला आहे. एकंदरीत चंद्रपूर जिल्ह्यासाठी रब्बी हंगामातील पिकांची गरजेनुसार पुरेसा रासायनिक खतसाठा स्थानिक बाजारात उपलब्ध असल्याचे कृषी विभागाने कळविले आहे.
००००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here