राष्ट्रवादीला रामराम तर भाजपला जय श्रीरामचा नारा, जिल्ह्यात भाजपाची ताकत वाढणार.
चंद्रपूर :-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य पदाधिकारी डॉ. अशोक जिवतोडे यांचा येणाऱ्या १४ मार्चपर्यंत भाजप प्रवेश निश्चित मनाला जातं असून त्यांच्या भाजप प्रवेशाने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. दरम्यान भाजप कडून ते लोकसभा लढवू शकतात किंव्हा वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात ते भाजपचे विधानसभा निवडणुकीत उमेदवार सुद्धा राहू शकतात अशी चर्चा आहे. त्यांच्या भाजप प्रवेशाने भाजप ला ताकत मिळणार असून येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांची उपस्थिती भाजप ला मोठी उभारणी देऊ शकते असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
डॉ. अशोक जिवतोडे हे मागील ३५ वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात असून जनता महाविद्यालयात प्राध्यापक ते प्राचार्य असा त्यांचा शैक्षणिक प्रवास व निष्कलंक, चारित्र्यवान व्यक्तिमत्त्व, अशी ओळख त्यांनी निर्माण केली आहे. ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासमंडळाचे अध्यक्ष आहेत. गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचे माजी अध्यक्ष तथा अधिष्ठाता, नामनियुक्त सदस्य, शिक्षण अभ्यासमंडळ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व गोंडवाना विद्यापीठाच्या प्राचार्य व प्राध्यापकांच्या संघटनेद्वारे होणाऱ्या कार्यात डॉ. अशोक श्रीहरी जीवतोडे यांचा सक्रिय सहभाग नेहमीच असतो. पूर्व विदर्भातील गोंडवन, आदिवासी, दुर्गम भागातील शैक्षणिक क्रांतीचे जनक शिक्षणमहर्षी स्व. श्रीहरी बळीराम जीवतोडे गुरुजींचे चिरंजीव तथा चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, यवतमाळ जिल्हयात शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणाऱ्या विदर्भातील अग्रगण्य अशा नावाजलेल्या चांदा शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूर या संस्थेचे मागील २७ वर्षापासून ते सचिव म्हणून प्रशंसनीय संघटन कार्य करत आलेले आहे.
डॉ अशोक जिवतोडे हे दरवर्षी संस्थेच्या व स्व. जीवतोडे गुरुजी प्रतिष्ठानाच्या माध्यमातून जिल्हाभरात आणि जिल्ह्याबाहेर मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड, संवर्धन व रक्तदान शिबिरांच आयोजन करतात. वृक्ष लागवडीमध्ये सहभाग घेणाऱ्या इतर सामाजिक संघटनांना वृक्ष आणि बियाणांचा मोफत पुरवठा केला जातो. ग्रामीण भागात विशेषतः अतिदुर्गम भागात आरोग्य शिबिरांचे आयोजन नियमित केले जाते. संस्थेअंतर्गत तसेच संस्थेबाहेर विविध क्षेत्रांतील व्यक्तींना प्रोत्साहन, विशेषतः संशोधन कार्य, साहित्य प्रकाशन, चित्रकला, रंगकर्मी, पत्रकारिता आदी समाजोपयोगी कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन आणि सर्व प्रकारची मदत केली जाते. शेतकऱ्यांसाठी समाजप्रबोधन तथा अंधश्रद्धा निर्मूलन व विद्यार्थ्यांसाठी नैराश्यातून घडून येत असलेल्या आत्महत्या संदर्भात प्रबोधन करण्याचा त्यांचा प्रयत्न निश्चितच अभिनंदनीय आहे. त्यांच्या माध्यमातून व्यसनाधीनता व वाढत असलेली अंधश्रद्धा दूर व्हावी, म्हणूनच राष्ट्रीय कीर्तीचे विविध प्रबोधनकार, कीर्तनकार यांचे प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाला जिल्हाभरातून ५०,००० लोकांची उपस्थिती असते. अंधश्रद्धा निर्मूलनार्थ अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष स्व. डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि अन्य मान्यवरांच्या व्याख्यानाचे आयोजन त्यांनी आजवर केलेले आहे.