स्वातंत्र्यवीर सावरकरांचा त्याग विसरता येणार नाही
चंद्रपूर,दि,८ ,भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात कित्येकांनी बलीदान दिले. असंख्य स्वातंत्र्यसेनानी या लढ्यात उतरले. यापैकी अनेकांसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेरणास्थान होते. सावरकरांनी अखेरच्या श्वासापर्यंत भारताच्या स्वातंत्र्याचाच विचार केला आणि त्यासाठीच ते लढले. त्यांचे योगदान आणि त्याग कधीही विसरता येणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री ना. श्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर चौकाच्या नामकरण फलक अनावरण प्रसंगी ते बोलत होते.यावेळी भाजपा महानगर अध्यक्ष डॉक्टर मंगेश गुलवाडे, माजी उपमहापौर राहुल पावडे, महानगरचे महामंत्री राजेंद्र गांधी, ब्रिजभूषण पाझारे,सुभाष कासनगोट्टूवार,रवींद्र गुरनुले, कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, महिला मोर्चा अध्यक्ष अंजली घोटेकर,युवा मोर्चा अध्यक्ष विशाल निबांळकर,मंडल अध्यक्ष रवी लोणकर, दिनकर सोमलवार, सचिन कोतपल्लीवार, संदीप आगलावे, विठ्ठल डुकरे व आदी उपस्थित होते.
ना.श्री.सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले,जगात असंख्य स्वातंत्र्य लढे झाले. कित्येकांचे बलीदान गेले. पण तरीही संपूर्ण जगात केवळ विनायक दामोदर सावरकर यांनाच स्वातंत्र्यवीर असे संबोधले जाते, असे गौरवोद्गारही ना. मुनगंटीवार यांनी काढले. ते पुढे म्हणाले, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे देशासाठी त्याग आणि बलिदान अमूल्य आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी समाजनिर्मितीसाठी आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठीही कार्य केले. समाजसुधारणेवर त्यांनी भर दिला.’ ‘ब्रिटीशांचा प्रचंड छळ सहन केल्यानंतरही त्यांच्या मनात एकच भावना होती, ती म्हणजे देश स्वतंत्र झाला पाहिजे. अशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना सावरकरांचे बलिदान विसरून चालणार नाही,’ याचाही ना. श्री. मुनगंटीवार यांनी आवर्जुन उल्लेख केला.
राहुल गांधींच्या उलट्या बोंबा
राहुल गांधी शिक्षणासाठी परदेशात जातात तेव्हा भितीपोटी राहुल विंची असे नाव ठेवतात. आणि आता तेच राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भित्रा संबोधतात. ह्या तर चोराच्या उलट्या बोंबा झाल्या, या शब्दांत ना. मुनगंटीवार यांनी समाचार घेतला. जी व्यक्ती आपल्या नावाशी एकनिष्ठ राहू शकत नाही, ती देशासोबत कशी एकनिष्ठ राहिल, असा सवालही त्यांनी केला. इटलीने नेहमीच भारताचा अवमान केलाय. त्या इटलीशी तुमची नाळ आजही जुळली आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला शहाणपणा शिकवू नये, अश्या तीव्र शब्दांत ना. श्री. मुनगंटीवार यांनी सुनावले.