Home चंद्रपूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना आदरांजली व भव्य आतिशबाजी करून...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना आदरांजली व भव्य आतिशबाजी करून लाडू वाटप

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर :-  आजचा दिवस हा महाराष्ट्रच नाही तर देशाच्या इतिहासातील ऐतिहासिक दिवस आहे. सर्वसामान्यांचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी ज्यांनी आपले आयुष्य वेचले अशा शिवछत्रपतींचे स्मरण आपण करत आहोत. त्यांनी स्वराज्य उभे केल्यावर राज्यकारभार स्वीकारला तो दिवस हा आजचा दिवस आहे. कारभार स्वीकारला पण राज्य कोणासाठी करायचे? तर राज्य हे सर्वसामान्यांसाठी करायचे, ही राज्यातील जनतेची शक्ती, आणि सत्ता ही जनतेसाठी वापरायची हे सूत्र शिवछत्रपतींनी आपल्यापुढे ठेवले. त्याचे स्मरण करण्याचा आजचा हा दिवस आहे.

या देशात अनेक राजे होऊन गेले. त्यांचा इतिहासही आहे. पण साडेतीनशे वर्षे झाल्यानंतर सुद्धा देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेल्यावर देशातील राजांपैकी शिवछत्रपती हे एकच नाव निघते. त्याचे कारण त्यांनी कधीच राज्य त्यांच्यासाठी चालवले नाही. देशात अनेकांची नावे घेता येतील ज्यांनी राज्य त्यांच्या घराण्याच्या नावाने चालवले. यात एकच शिवछत्रतींचा अपवाद होता. त्यांनी कधीही भोसले यांचे राज्य केले नाही, तर हिंदवी स्वराज्य, रयतेचे राज्य तयार केले. राज्य हे रयतेसाठी चालवायचे, हा आदर्श त्यांनी संपूर्ण देशासमोर ठेवला.

सत्ता ही कशी वापरावी, कोणासाठी वापरावी याचाही आदर्श शिवछत्रपतींनी घालून दिला. शेतकऱ्याला मदत करण्याची भूमिका किंवा सोन्याच्या नांगराचा फाळ देण्याचा विचार असो.. शेवटच्या माणसाला सन्मानाने जगण्यासाठी, त्याला पुढे नेण्यासाठी जे काही लागेल ते देण्यासाठी सत्ता, असे त्यांचे सूत्र होते. म्हणून त्यांनी कष्टाने, घामाने, त्यागाने, शौर्याने राज्य प्रस्थापित केले. ते राज्य ग्रहण करण्याचा ऐतिहासिक सोहळा झाला.

काही घटकांनी त्याला वेगळ्या दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न केला. पण या देशातील सामान्य माणसाने पहिल्यांदा आपला राजा हा सत्तेवर बसलेला पाहिला. त्याचा सन्मान, त्याचे स्वागत ही भूमिका अंत:करणापासून स्वीकारली. जनतेच्या अंत:करणात स्थान प्राप्त करून घेणारे असे आदर्श राजे आणि त्यांच्या सत्ताग्रहणाचा आनंद सोहळा सर्वत्र साजरा होणे आवश्यक आहे. जो काही आदर्श असेल तो कृतीमध्ये आणण्यासाठी जे काही करता येईल ते सर्व करण्याचा आपण सर्व मिळून प्रयत्न करूया.

आजच्या कार्यक्रमाचे भव्य अशे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिनव देशपांडे, उपाध्यक्ष केतन जोरगेवार, राहुल वाघ यांनी केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसह किल्ल्याची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली असुन विधिवत पुजा करण्यात आली. पूजेप्रसंगी भव्य आतिशबाजी करीत उपस्थितांना लाडू वाटप करण्यात आले.

सदर आदरांजली कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन भटारकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष सुनील भाऊ काळे, जेष्ठ नेते बब्बू भाई शेख, अल्पसंख्याक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष नौशाद भाई सिद्दीकी, शहर उपाध्यक्ष राहुल देवतळे, कुमार पॉल, निसार शेख, विद्यार्थी अध्यक्ष कोमिल मडावी, विपिल लभाणे, सुरज चव्हाण, नितीन घुबडे, सतिष मांडवकर, मनोज सोनी, मंगेश वैद्य, विजय राऊत, पंकज मेंडे, सुधीर पोईला, अंकित लाड, अक्षय पराते, सोनू दर्संवर, यश चहरे, अमित उमेट, निखिल गेडाम, स्वप्निल गेडाम, नदीम शेख, अक्षय सगदेव, संजू बिस्वास, राज रामटेके, प्रतीक गैनवार उपस्थित होते.

 

#शिवराज्याभिषेकसोहळा३५०

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here