अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी
चंद्रपूर :- सर्वोच्च न्यायालयाने दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी व्यापाऱ्यांना दिलेली दोन महिन्याची मुदत संपुष्टात आल्यानंतर ज्या दुकानांच्या पाट्यांवर मराठी नामाक्षरे नाहीत त्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झालेली आहे. जागोजागी खळ-खट्याक मनसे स्टाईल आंदोलने सुरू आहे. महाराष्ट्रात मराठी भाषेचा अपमान ,दिले जाणारे दुय्यम स्थान तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान सहन केला जाणार नाही. हीच मनसेच्या आंदोलनामागील भूमिका आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच मराठी भाषा व मराठी पाट्या याकरिता आग्रही होती. याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या “मराठी पाट्या करा” या आदेशाचा आधार घेत मनसे शहर अध्यक्ष सचिन भोयर यांच्यावतीने चंद्रपूर शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व दुकाने व आस्थापनांवरील पाट्या मराठीत करा तसे व्यापाऱ्यांनी न केल्यास इतर महानगरपालिकांप्रमाणे व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा. या मागणीचे निवेदन चंद्रपूर मनपा आयुक्त विपिन पालीवाल यांना मनसेतर्फे दिले आहे.
येत्या काही दिवसात शहरात ठळक अक्षरात दुकानांवर मराठी पाट्या दिसल्या नाही तर मनसेतर्फे मनसे स्टाईल खळखट्याक आंदोलन करणार असा स्पष्ट इशारा सचिन भोयर यांनी मनपा प्रशासनाला दिला आहे. आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास सर्वस्वी जबाबदारी ही मनपा प्रशासन,पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनाची असेल त्याबाबतीचे निवेदन पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना देखील देण्यात आले आहे.
यावेळी मराठी कामगार सेना जिल्हा अध्यक्ष नितीन भोयर, शेतकरी सेना जिल्हा अध्यक्ष आनंद बावणे, वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष महेश वासलवार, युनिट सचिव ओमेश बावीस्कर, युनिट सहसचिव शेशकुमार राखुंडे, मंगेश धोटे, वैभव माकोडे, शुभम ठाकुर, मंगेश चौधरी, आशिष भुसारी,अनरोज रायपूरे, अक्षय बल्लावर,सुमित उमाटे,अक्षय पाल यादी उपस्थीत होते.