नव्या दारु दुकानांना परवाणा देत असतांना शासनाच्या नियमांचे पालन करा – आ. किशोर जोरगेवार
अधिवेशनात केली मागणी
राजेंद्र मेश्राम
विशेष जिल्हाप्रतिनिधी
चंद्रपूर:- चंद्रपूरातील दारु बंदी उठविण्यात आल्या नंतर मोठ्या प्रमाणात दारु परवाणे वाटप करण्यात आले आहे. मात्र हे परवाणे वाटप करत असतांना काही ठिकाणी शासन नियमांचे उलंघन झाले आहे. या विरोधात अनेक आंदोलने करण्यात आली आहे. त्यामुळे नव्या दारु दुकानांना परवाणा देत असताना शासन नियमांचे पालन करण्यात यावे अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात केली आहे.
चंद्रपूरातील दारु बंदी उठविण्यात आली आहे. याला आता दोन वर्ष पुर्ण होत आले. चंद्रपूरात दारु बंदी असताना सर्रासरित्या अवैध दारु विक्री सुरु होती. त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढले होते. गुंड प्रवृत्तीचे लोक अवैध दारुविक्रीच्या व्यवसायात गुंतल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे चंद्रपूर जिल्हातील दारुबंदी उठविण्यात यावी अशी मागणी जोर धरु लागली होती. याची दखल घेत महाविकास आघाडी सरकारने चंद्रपूर जिल्हाची दारु बंदी हटविली होती. त्यानंतर अनेक दारु दुकानांना परवाणा देण्यात आला. मात्र यात नियमांची पायमल्ली करण्यात आली असल्याचा आरोप झाला. या विरोधात अनेक ठिकाणी आंदोलने झाली.
दरम्यान आज नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आमदार किशोर जोरगेवार यांनी हा मुद्दा उपस्थित करत सभागृहाचे लक्ष वेधले. यावेळी बोलतांना ते म्हणाले कि, मागच्या सरकाने दारु बंदी उठविण्याचा चांगला निर्णय घेतला होता. दारुबंदी झाली तेव्हा 350 परवाणे चंद्रपूर जिल्हात होते. दारुबंदी उठल्या नंतर अडिच वर्षात 733 परवाण्यांना परवाणगी देण्यात आली आहे. मात्र यावेळी 75 मीटर पर्यंत शाळा नसावी, धार्मीक स्थळ नसावे ही अट असतांना सुध्दा याकडे दुर्लक्ष करत मोठ्या प्रमाणात नवे परवाणे देण्यात आले आहे. त्यामुळे या विरोधात अनेक आंदोलने झाली आहे. यात महिलांच्या भावना तिव्र आहेत. त्यामूळे दारु दुकानांना नव्याने परवाणा देत असतांना शासनाच्या नियमांचे पालन झाले पाहिजे अशी मागणी यावेळी अधिवेशनात बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.