Home चंद्रपूर डॉ. आंबेडकरांचे संविधान देशास मिळालेली जगातील सर्वोत्कृष्ट भेट – विरोधी पक्षनेते विजय...

डॉ. आंबेडकरांचे संविधान देशास मिळालेली जगातील सर्वोत्कृष्ट भेट – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार प्रजासत्ताक दिनानिमित्त ब्रह्मपुरीत “लहरा दो तिरंगा’ कार्यक्रमाचे आयोजन

डॉ. आंबेडकरांचे संविधान देशास मिळालेली जगातील सर्वोत्कृष्ट भेट – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

प्रजासत्ताक दिनानिमित्त ब्रह्मपुरीत “लहरा दो तिरंगा’ कार्यक्रमाचे आयोजन

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर:-देशातील सर्वधर्म पंथीय व विविध समाजातील नागरिकांना जगण्याचा समान हक्क मिळावा यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानातून देशात लोकशाही स्थापन झाली. या लोकशाहीतून प्रत्येकाला जगण्याचा समान अधिकार मिळाला. मात्र सध्या देशात लोकशाहीवर घाला आणण्याचे षडयंत्र सुरू आहे. बाबासाहेबांनी संविधान रुपी दिलेली भेट ही जगातील सर्वोत्कृष्ट भेट असून संविधान वाचविण्यासाठी आपण सर्वांनी मनुवादी विचारांवर प्रहार करून त्याचा बिमोड करावा असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. ते ब्रह्मपुरी येथे युवक काँग्रेसच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्ताने आयोजित लहरा दो तिरंगा कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते.

आयोजित कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून प्राचार्य देविदास जगनाडे, ब्रह्मपुरी नगराध्यक्ष रीताताई उराडे ,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमूरकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रभाकर सेलोकर, डॉ.गेडाम, नगरसेवक हितेंद्र राऊत, काँग्रेस युवक विधानसभा अध्यक्ष सोनू नाकतोडे, भूषण रामटेके ,अनुकूल शेंडे, वकार भाई खान ,युवक विधानसभा उपाध्यक्ष अमित कन्नाके ,कल्पना गेडाम प्रामुख्याने उपस्थित होते.

पुढे बोलताना विरोधी पक्षनेते व वडेट्टीवार म्हणाले की, ब्रिटिश राजवटीत देश गुलामीत असताना स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती देत बलिदान दिले. मात्र त्याकाळी ब्रिटिशांचे पाय चाटणारे आज राष्ट्रभक्त म्हणून मिरवीत आहेत. देशात धर्मांधता व जातीय तेढ निर्माण करून मनुवादी विचारांचा विस्तार होत असून देश गुलामगिरीच्या वाटेवर आहे. बहुजनांची मुले शिक्षणापासून वंचित रहावे याकरिता विविध कायदे करून खाजगी शिकवणी वर्ग बंद करण्यात आली. देशात बेरोजगारी, घटलेला विकास दर ,देशावरील वाढलेले कर्ज व वाढलेली गुन्हेगारी यामुळे संपूर्ण देशाचे वाटोळे झाले असून सत्ताधारी मात्र धर्मांधता पसरवून जनतेची दिशाभूल करत आहे. आता संविधान वाचवणे ही तुमची आमची जबाबदारी असून देशात लोकशाही टिकवायची असेल तर पुढाकार घेऊन मनुवादी विचारांचा बिमोड करा असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चीमुरकर व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य देविदास जगनाडे यांनी देशासाठी बलिदान देणाऱ्या थोर महात्म्यांच्या बलिदानाचे महत्त्व पटवून देत देशविरांच्या शौर्याची गाथा सांगितली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश डांगे ,प्रास्ताविक युवक काँग्रेस शहराध्यक्ष सुरज मेश्राम यांनी केले. यानंतर देशभक्तीपर गायनाचा व नृत्य स्पर्धेचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here