लोकसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाकरीता निधी उपलब्ध करुन द्या.- खासदार प्रतिभा धानोरकर
रस्ते मार्ग आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांची घेतली भेट.
राजेंद्र मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर :-चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभा क्षेत्राच्या विकासाचे ध्येय समोर ठेवून काम करायला सुरुवात केली असून केंद्रातून क्षेत्राच्या विकासासाठी निधी आणण्याकरीता त्यांनी रस्ते मार्ग आणि महामार्ग मंत्री मा.श्री. नितीनजी गडकरी यांची भेट घेतली.
चंद्रपूर लोकसभा क्षेत्र हे बहुतांश आदिवासी बहुल असून ग्रामीण भागाचा जास्त समावेश असणाऱ्या या लोकसभा क्षेत्रात रस्त्यांचा विकास व्हावा यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज दिल्ली येथे मा.श्री. नितिनजी गडकरी यांची भेट घेऊन रस्ते आणि महामार्ग संदर्भात निवेदन देऊन चर्चा केली. यात प्रामुख्याने वरोरा-चिमुर प्रलंबित महामार्ग तात्काळ पुर्ण व्हावा याकरीता आपल्याकडून प्रयत्न केले जावे अशी विनंती देखील केली. तसेच चंद्रपूर जिल्हातील भद्रावती तालुक्यातील कोंढा-माजरी-पाटाळा-मणगांव-थोराणा-वरोरा-मोहबाळा या कामांकरीता 70 कोटी रुपये त्यासोबतच भद्रावती तालुक्यातील माजरी-पळसगांव-नंदोरी-भटाळी-चोरा-चंदनखेडा या रस्त्याकरीता 40 कोटी रुपये, वरोरा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग 371 ते पिंपळगांव(सिंगरु) ते तुमगांव वाही या रस्त्याच्या कॉक्रीटीकरणाकरीता 50 कोटी रुपये, भद्रावती तालुक्यातील सुमठाणा-तेलवासा-जुनाळा रस्त्याचे रुंदीकरणासह बांधकाम करण्याकरीता 75 कोटी रुपये तसेच राजुरा तालुक्यातील वरुर-विरुर धानोरा-आर्वी रस्त्याकरीता 46 कोटी रुपये तसेच सास्ती-कोलगांव-कढोली-चढी-निरली-धिंडसी-मार्डा या रस्त्याकरीता 13 कोटी रुपयांची मागणी करुन निधी उपलब्ध करुण्याची विनंती खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडून करण्यात आली. यासंदर्भात मा.श्री. नितीनजी गडकरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना वरोरा-चिमुर रस्त्याचे काम तात्काळ पुर्ण करण्याच्या सुचना दिल्या. त्यासोबत वरील कामांकरीता निधी लवकरच उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन देखील दिले.
—