अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी
चंद्रपूर :- जिल्ह्याच्या पोलीस दलाचे हृदय समजल्या जाणाऱ्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत (एलसीबी चंद्रपूर) मोठे फेरबदल होण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यात अलीकडच्या काळात अनेक गंभीर घटना घडल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. या घटना पाहता एलसीबीमध्ये पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या आठ पोलीस हवालदारांच्या बदल्या करून नवीन लोकांना संधी दिली जाणार आहे.
सध्या पोलीस भरती प्रक्रिया सुरू असून जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन या भरतीमध्ये व्यस्त आहेत. दरम्यान, जिल्ह्यात अनेक गंभीर घटना घडल्या आहेत. चंद्रपूर शहरातील गजबजलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये मनसे पदाधिकाऱ्यावर भरदिवसा गोळीबार, वरोरा येथील पोलीस कोठडीत खुनाच्या आरोपीची आत्महत्या, राजुरा येथील वाळू तस्करांचा हल्ला, बल्लारपूर येथील घटना आदी घटनांमुळे पोलिसांना टीकेला सामोरे जावे लागले आहे.
एलसीबी हे जिल्हा पोलीस दलाचे हृदय मानले जात असून त्याचा थेट संबंध जिल्हा पोलीस अधीक्षकांशी आहे. अनेक मोठ्या घटनांचा तपास एलसीबीकडे सोपवला जातो, मात्र गेल्या काही महिन्यांपासून एलसीबीच्या कारवाया मंदावल्या आहेत. चंद्रपुरात सुदर्शन मुम्मका यांनी पदभार स्वीकारताच एलसीबीने अनेक कारवाया केल्या होत्या, मात्र गेल्या पंधरा दिवसात घडलेल्या गंभीर घटना पाहता जिल्हा पोलीस अधीक्षकांनी एलसीबीमध्ये मोठा फेरबदल करण्याचे संकेत दिले आहेत.
एलसीबीमध्ये पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या आठ पोलीस हवालदारांची बदली यादी तयार करण्यात आली असून एक-दोन दिवसांत बदलीचे आदेश निघतील. पोलीस हवालदार मिलिंद चव्हाण यांची राजुरा पोलीस ठाण्यात, जमीर पठाण यांची मूल येथे, अनुप डांगे यांची राजुरा, नईम पठाण यांची वरोरा, चंदू नागरे यांची भद्रावती, मनोज रामटेके यांची चिमूर, सुरेश बलकी यांची गडचांदूर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
अपर्णा मानकर यांची सीआरओकडे बदली होणार आहे. या बदल्यांमुळे इतर पोलीस ठाण्यातील सक्षम पोलीस हवालदारांना एलसीबीमध्ये काम करण्याची संधी दिली जाणार आहे. या यादीत रामनगर पोलिस ठाण्यातील सतीश अवतारे, किशोर वैरागडे आणि रजनीकांत पुट्टावार यांचा समावेश आहे.