Home चंद्रपूर मी सामान्य कुटुंबातला म्हणूनच सामन्यांच्या वेदना जाणतो – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार...

मी सामान्य कुटुंबातला म्हणूनच सामन्यांच्या वेदना जाणतो – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सावली तालुक्यातील २३६५ घरकुल लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण

आम्ही सत्तेत येताच घरकुल निधी ३ लक्ष करू

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हा प्रतिनिधी

सावली:-समाजातील विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील दुर्बल घटक यांची अतिशय हलाखीची परिस्थिती व जिवनमान बघून यांचेकरिता महाविकास आघाडी सरकार काळात या खात्याचा मंत्री असतांना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना कार्यान्वित केली. आज एकट्या ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात हजारोंच्या संख्येने लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला. महागाईच्या काळात घरकुलाचा निधी अत्यल्प असला तरी आम्ही सत्तेत येताच घरकुल निधीत दुप्पटीने वाढ करत ३ लक्ष करू असे अभिवचन देत मी सामान्य कुटुंबातला असल्यानेच मला सामन्यांच्या दुःखाची व वेदनांची जाणं आहे. असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. ते सावली येथे आयोजित यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अंतर्गत मंजूर घरकुल लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण कार्यक्रमात अध्यक्ष म्हणुन बोलत होते.

आयोजित कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती दिनेश चिटनुरवार, सावली तहसीलदार प्रांजली चिरडे, गटविकास अधिकारी मधुकर वासनिक, सहा. गटविकास अधिकारी तेलकापल्लीवार, माजी तालुका अध्यक्ष राजेश सिद्धम ,तालुका काँग्रेस अध्यक्ष नितीन गोहने, शहर काँग्रेस अध्यक्ष विजय मुत्यालवार, महीला आघाडी अध्यक्षा उषाताई भोयर, सावली नगराध्यक्षा लता लाकडे, उपनगराध्यक्ष संदीप पुण्यापकार, काँग्रेसचे जेष्ठ तांगडे पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य यशवंत ताडाम, विमुक्त जाती भटक्या जमाती सेल तालुका अध्यक्ष हरिदास मेश्राम,माजी प. स. सभापति विजय कोरेवार, तालुका सरपंच संघटना अध्यक्ष पुरुषोत्तम चुधरी, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष किशोर कारडे, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष अमरदीप कोनपत्तीवार, तथा ईतर काँग्रेस पदाधिकारी यावेळी मंचावर उपस्थित होते.

पुढे बोलतांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, सिंदेवाही शहरातील मेश्राम कुटुंबाची व्यथा बघितल्यानंतर विमुक्त भटक्या जाती व जमातींकरिता विकास योजना आणण्याचा मी संकल्प केला. तर महाविकास आघाडी सरकार काळात मंत्री झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना कार्यान्वित करून हजारोंच्या संख्येने राज्यातील लाभार्थ्यांना स्वप्नातील हक्काची घरे दिली. तर संपूर्ण राज्याच्या तुलनेत ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात ६३८१ कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळालेला असून पुढील काळात एकही कुटुंब घरकुला पासून वंचित राहणार नाही. सोबतच ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात गोसेखुर्दचे आणि शेतीसाठी उपलब्ध करून देऊन या क्षेत्रात शेती समृद्ध क्रांती घडविली. मानवतेचे प्रेम हे सर्वश्रेष्ठ असून माणुसकी हीच जात सर्वात मोठी आहे. म्हणूनच मी मानव सेवेसाठी सदैव अग्रेसर राहून जनतेसाठी हिरीरीने काम करतो असेही ते यावेळी म्हणाले. तसेच इतर घरकुल योजनांमार्फत अनेक लाभार्थ्यांना देखील घरकुले मंजूर करून दिली. येत्या काळात आमची सत्ता येताच महागाईचा विचार करून घरकुलाच्या निधीत दुपटीने वाढ करत ३ लक्ष रुपये करू असे अभिवचन त्यांनी यावेळी उपस्थितांना दिले. यानंतर सावली तालुक्यातील एकूण २३६५ घरकुल लाभार्थ्यांना मंजुरीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण गेडाम,तर प्रस्ताविक काँग्रेस तालुकाध्यक्ष नितीन गोहणे यांनी केले. आयोजित कार्यक्रमास तालुका काँग्रेस कमिटी सर्व सेल पदाधिकारी, नगरपंचायत सावली पदाधिकारी, नगरसेवक ग्राम काँग्रेस कमिटी अध्यक्ष ग्राम पातळीवरील सर्व सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी, काँग्रेस कार्यकर्ते व हजारोंच्या संख्येने घरकुल लाभार्थी व नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here