ग्रामीण भागातील समस्या प्राथमिकतेने सोडवा – आ. किशोर जोरगेवार
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन बैठकीत सूचना
राजेंद्र मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर:-मतदारसंघातील ग्रामीण भागाच्या सर्वसमावेशक विकासासाठी आपण मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. यामुळे येथे विकासकामे प्रगतीपथावर आहेत. जिल्हा परिषदेनेही या भागाच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करून ग्रामीण भागातील समस्या प्राथमिकतेने सोडवाव्यात, अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांना दिल्या आहेत.
ग्रामीण भागातील विविध समस्यांबाबत आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा परिषद येथे बैठक बोलावली होती. सदर बैठकीला छोटा नागपूरचे उपसरपंच ऋषभ दुपारे, यंग चांदा ब्रिगेडचे करण नायर, मोरवा उपसरपंच भूषण पिदुरकर, नगाळा ग्रामपंचायत सदस्य प्रकाश शेंडे, पिपरी सरपंच मातने, मोरवा सरपंच साव आदींची उपस्थिती होती.
इरई नदीवरून रहदारीसाठी पूल बांधण्याची मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे. मौजा बोररीठ आणि गोविंदपूर येथील शेतकऱ्यांना येथील पूल बांधल्यास वाहतुकीची मोठी सुविधा होईल, म्हणून येथे पूल तयार करण्यात यावा, १५व्या वित्त आयोग अंतर्गत पीएफएमएफ प्रणालीमधील तांत्रिक अडचणीमुळे ग्रामपंचायत नागाळा (सी) तहसील चंद्रपूर येथील विकासकामे रखडली आहेत. स्थानिक प्रशासनाने या अडचणी सोडवण्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात, मौजा मोरवा मीरा नगर वसाहत येथे विकासकामे करण्यात यावी, चोराळा समोरील जेट किंगडम कॉलनी देवाडा येथील रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी.
राज्यस्तरावर स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा २ अंतर्गत कचराकुंडी दर कराराबाबत तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे. कचराकुंडी व्यवस्थापनामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला आणि पर्यावरणाला फायदा होणार आहे, त्यामुळे सदर काम प्राथमिकतेने करण्यात यावे, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. मा. सा. कन्नमवार यांच्या पुतळ्याचे सौंदर्यीकरण व रंगरंगोटी करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत निधी उपलब्ध करण्यात यावा. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित असलेल्या वृद्ध कलावंत मानधन योजने अंतर्गत अर्जांना मंजूरी देण्याची मागणी करण्यात आली आहे, त्यामुळे प्रलंबित वृद्ध कलावंत मानधन योजना प्रकरण मंजूर करण्यात यावे, अशी सूचना सदर बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांना दिल्या आहेत. या बैठकीला गावकऱ्यांचीही उपस्थिती होती.