प्रत्येक संकटकाळी भाऊ म्हणून उभा राहील – आ. किशोर जोरगेवार
गाव माझा उद्योग फाऊन्डेशन तर्फे आयोजित महिला उद्योजीकांचा एक दिवसीय मेळावा
राजेंद्र मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर:-महाराष्ट्र सरकारने ‘लाडकी बहीण योजना’ सुरू करून महिलांना आत्मनिर्भर करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. यापुढेही बहिणींना मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यात वाढ करण्यात येणार आहे. आम्हीही आमच्या लाडक्या बहिणींना स्वयंरोजगारातून आर्थिक सक्षम करण्यासाठी विविध प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केले आहे. यामुळे अनेक महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे. पुढेही असे उपक्रम सुरु राहणार असून प्रत्येक संकटकाळी भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी उभा राहीन, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
गाव माझा उद्योग फाऊंडेशनतर्फे घुग्घुस येथील स्नेहप्रभा मंगल कार्यालयात महिला उद्योजिकांसाठी “लखपती दीदी” या एकदिवसीय महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर, भाजप घुग्घुस शहर अध्यक्ष विवेक बोडे, माजी ग्रामपंचायत सदस्य संजय तिवारी, रघुवीर अहिर, गाव माझा उद्योग फाऊंडेशनचे संचालक पवन वानखेडे, सह-संचालिका अष्टगाथा वानखेडे, जनरल मॅनेजर जसवंत बहादुरे, आणि रिजनल मॅनेजर राजकुमार भडके आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, निवडणूक प्रचाराकरिता आज घुग्घुस येथे विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. घुग्घुस शहराच्या विकासाला आपले नेहमीच प्राधान्य राहिले आहे. आपण येथील ग्रामपंचायतीचे रुपांतरण नगरपरिषदेत केले. त्यानंतर आता घुग्घुस शहराच्या विकासाला गती मिळाली आहे. येथे ग्रामीण रुग्णालयाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे, तर काही दिवसांत येथील प्रमुख समस्या असलेल्या उड्डाणपूलाचे कामही पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महिलांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी आधार निर्माण करणे हा स्तुत्य उपक्रम आहे. महिलांनी समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे; मात्र, त्यांच्यातील उद्योगशीलतेला आणि व्यवसायवाढीसाठी योग्य दिशा देणे गरजेचे आहे. हीच गरज लक्षात घेऊन या “लखपती दीदी” मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांच्या उद्योगांचे विस्तार, आर्थिक स्थितीचे उन्नतीकरण, तसेच आत्मनिर्भरतेची भावना बळकट करण्यासाठी या उपक्रमाचा निश्चितच मोठा फायदा होणार आहे, असे यावेळी आ. जोरगेवार म्हणाले.
मागील पाच वर्षांत आपण विविध प्रकारचे प्रशिक्षण शिबिरे घेऊन ५ हजार महिलांना प्रशिक्षण दिले आहे, यातील अनेक महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे, असेही आ. जोरगेवार यांनी सांगितले. या मेळाव्याला हजारो महिलांची उपस्थिती होती.