ब्रेकिंग न्यूज, चंद्रपूरमध्ये पाणीपुरवठा विभागात मोठा भ्रष्टाचार उघडकीस – ४.२० लाख रुपयांची लाच घेताना तीन अधिकारी रंगेहात अटकेत!
चंद्रपूर :- जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १० एप्रिल रोजी केलेल्या धडक कारवाईत ४ लाख २० हजार रुपयांची लाच घेताना तीन शासकीय अधिकारी रंगेहात पकडले गेले. या कारवाईमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील प्रशासनात खळबळ उडाली असून, जिल्हा परिषद वर्तुळात एकच खसखस माजली आहे.
News reporter :- अतुल दिघाडे
जल जीवन मिशन अंतर्गत २३ गावांमध्ये पाणीपुरवठा कामे
राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी ‘जल जीवन मिशन’ कार्यक्रमांतर्गत जिवती व राजुरा तालुक्यातील २३ गावांमध्ये पाणीपुरवठा योजनेची कामे करण्यात आली होती. ही कामे जिवती येथील एका खाजगी कंत्राटदारामार्फत पूर्ण करण्यात आली होती. काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित कंत्राटदाराने १० गावांच्या कामांची बिले जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे मंजुरीसाठी सादर केली होती. यामधून ५ गावांची सुमारे ४३ लाख रुपयांची बिले मंजूर झाली, मात्र उर्वरित बिलांसाठी विभागाकडून अडवणूक केली जात होती.
लाच मागणीचा घृणास्पद प्रकार
या बिलांच्या मंजुरीसाठी विभागाचे कार्यकारी अभियंता हर्ष यशोराम बोहरे यांनी कंत्राटदाराकडे ४ लाख रुपयांची लाच मागितली. ही रक्कम वरिष्ठ सहायक सुशील गुंडावार यांच्याकडे सुपूर्त करण्यास सांगण्यात आले. मात्र, गुंडावार यांनी देखील संधी साधत स्वतःसाठी २० हजार रुपयांची लाच वेगळी मागितली. अशा प्रकारे एकूण ४ लाख २० हजार रुपयांची लाच कंत्राटदाराला देण्यास भाग पाडले जात होते.
तक्रार दाखल, पडताळणी आणि सापळा
कंत्राटदाराने या प्रकाराची गंभीर दखल घेत चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर ७ एप्रिल ते ९ एप्रिल दरम्यान सखोल पडताळणी करण्यात आली आणि तक्रार खरी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर १० एप्रिल रोजी विभागाने अचूक नियोजन करत सापळा रचला.
लाच घेताना रंगेहात अटक
ठरल्याप्रमाणे, १० एप्रिल रोजी चंद्रपूर जिल्हा परिषद परिसरात कंत्राटदाराने ४ लाख २० हजार रुपयांची रक्कम वरिष्ठ सहायक सुशील गुंडावार यांच्याकडे सुपूर्त केली. गुंडावार यांनी पंचासमक्ष ही रक्कम स्वीकारली. त्यांनी त्यातील २० हजार रुपये स्वतःकडे ठेवले व उर्वरित ४ लाख रुपये परिचर मतीन शेख यांच्याकडे देत, “साहेबांच्या घरी नेऊन द्या,” असे सांगितले. मतीन शेख यांनी ही रक्कम कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे यांच्या घरी नेऊन दिली असता, त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सर्वांना रंगेहात पकडले.
तीघांवर गुन्हा दाखल
या प्रकरणात कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे, वरिष्ठ सहायक सुशील गुंडावार आणि परिचर मतीन शेख यांच्यावर रामनगर पोलीस स्टेशन, चंद्रपूर येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या यशस्वी कारवाईमुळे विभागात मोठी खळबळ उडाली असून अनेक अधिकारी आणि कर्मचारी धास्तावले आहेत.
लाचलुचपत विभागाची प्रभावी कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान, अप्पर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपअधीक्षक मंजूषा भोसले यांच्या नेतृत्वात पार पडली. या मोहिमेत पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले, शिवराज नेवारे, नरेशकुमार नन्नावरे, रोशन चांदेकर, अमोल सिडाम, प्रवीण ताडाम, वैभव गाडगे, पुष्पा काचोळे, सतीश सिडाम आणि संदीप कौरासे या कर्मचाऱ्यांनी महत्वाची भूमिका बजावली.
प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह
सदर घटना ही जल जीवन मिशनसारख्या जनतेच्या जीवनाशी थेट संबंधित योजनेत होणाऱ्या भ्रष्टाचाराचे उदाहरण आहे. काही दिवसांपूर्वी महसूल विभागातील तहसीलदार व तलाठ्यांवरही लाचखोरीच्या आरोपांखाली कारवाई झाली होती. आता जल जीवन मिशनमध्ये देखील लाचखोरीचे प्रकार समोर येत असल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील प्रशासनाची पारदर्शकता आणि प्रामाणिकता यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
सामाजिक आणि राजकीय पातळीवर संताप
या कारवाईनंतर जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे. जनतेच्या जीवनमरणाच्या प्रश्नाशी निगडित पाणीपुरवठा योजनेमध्ये असा भ्रष्टाचार होणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे नागरिक व्यक्त करत आहेत. शासनाने अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करून उदाहरण घालून द्यावे, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील प्रशासनाच्या नजरेआड होत असलेल्या भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या तडाखेबंद कारवायांची गरज आहे. नागरिकांनी अशा प्रकरणांना वाचा फोडण्यासाठी पुढे यावे, हीच काळाची गरज आहे.