“पाणीपुरवठा योजनेच्या बिल मंजुर लाच प्रकरणातील अभियंता हर्ष बोहरे यांच्या घरी ७.९९ लाख रुपयांची रोकड जप्त”
चंद्रपूर :- जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागात राबवण्यात येणाऱ्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या बिल मंजुरीसाठी लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले असून, या प्रकरणात धक्कादायक माहिती पुढे आली आहे. अटक करण्यात आलेल्या चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे यांच्या निवासस्थानी झडती घेतली असता तब्बल ७ लाख ९९ हजार ५१० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
News reporter :- अतुल दिघाडे
तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार, तालुक्यातील २३ गावांमध्ये जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेची कामे करण्यात आली. त्यातील १० गावांच्या कामांची बिले मंजुरीसाठी जिल्हा परिषद चंद्रपूर येथील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे सादर करण्यात आली होती. या पैकी ५ गावांच्या कामांची ४३ लाख रुपयांची बिले मंजूर झाली होती. उर्वरित बिलांची मंजुरी देण्यासाठी कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे यांनी ४ लाख रुपयांची लाच मागितली होती. ही रक्कम वरिष्ठ सहायक सुशील गुंडावार यांच्याकडे सुपूर्त करण्याचे सांगण्यात आले होते. गुंडावार यांनी स्वत: साठी आणखी २० हजारांची मागणी करत लाच रक्कम एकूण ४ लाख २० हजार रुपये केली.
या प्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर गुरुवारी (१० एप्रिल २०२५) सापळा रचण्यात आला. त्यामध्ये कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे, वरिष्ठ सहायक सुशील गुंडावार आणि कंत्राटी परिचर मो. मतीन फारून शेख यांना लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. या तिघांविरोधात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना शुक्रवारी (११ एप्रिल) न्यायालयात हजर केले असता, १३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
पुढील तपासात हर्ष बोहरे यांच्या घरी झालेल्या झडतीत ७.९९ लाख रुपयांची अघोषित रोकड सापडली आहे. यामुळे प्रकरण आणखी गंभीर झाले असून, लाचलुचपत विभाग या प्रकरणाची सखोल चौकशी करीत आहे. जल जीवन मिशनसारख्या महत्त्वपूर्ण योजनेत भ्रष्टाचार समोर आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे,