विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी “व्याख्यानमाला – दुसरे पुष्प” संपन्न; परवीन पठाण यांचा प्रभावी संदेश
चंद्रपूर :- छोटूभाई पटेल हायस्कूलमध्ये ३० ऑगस्ट २०२५ रोजी “व्याख्यानमाला – दुसरे पुष्प” हा प्रेरणादायी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम छोटूभाई पटेल हायस्कूल माजी विद्यार्थी संघातर्फे कै. स्वप्नील महावादीवार स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आला होता.
News reporter :- अतुल दिघाडे
कार्यक्रमाची सुरुवात स्व. छोटूभाई पटेल यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून करण्यात आली. या कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कांत (वैद्य) मॅडम, उपमुख्याध्यापक मानकर सर, निबांळकर सर, कुमरे मॅडम, तसेच माजी विद्यार्थी आशिष धर्मपुरिवार, जितेंद्र मशारकर, धीरज साळुंके आणि सागर कुंदोजवार यांची उपस्थिती होती.
मुख्य आकर्षण ठरली परवीन पठाण यांची मार्गदर्शनपर व्याख्यान. त्यांनी “सायबर क्राईम व लहान मुलांवरील अत्याचार – जागरूकता आणि उपाय योजना” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या व्याख्यानात त्यांनी सायबर क्राइमच्या वाढत्या प्रमाणावर, ऑनलाइन फसवणूक, सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर, तसेच बालकांवरील अत्याचाराच्या विरोधातील कायदेशीर तरतुदी याबद्दल विद्यार्थ्यांना जागरूक केले.
विशेषत: परवीन पठाण यांनी विद्यार्थ्यांना ‘भीती न बाळगता, धाडसाने चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवण्याची’ प्रेरणा दिली. “स्मार्टफोन आणि इंटरनेटचा वापर करत असताना, प्रत्येकाने सजग राहणे आणि आपल्या भोवतालच्या मुलांबाबत जागरूकता राखणे महत्त्वाचे आहे,” असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रश्नोत्तर सत्र आयोजित करण्यात आले, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि त्यांच्या शंकांचे समाधान केले.
कार्यक्रमाच्या आयोजनासंबंधी माजी विद्यार्थी संघाचे प्रतिनिधी ॲड. आशिष धर्मपुरीवार यांनी प्रास्ताविक केले, तर श्री पडोळे सर यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपस्थित पालक, शिक्षक, माजी विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाचे सर्वत्र कौतुक केले.
“व्याख्यानमाला” या उपक्रमाच्या दुसऱ्या पुष्पाचे आयोजन विद्यार्थ्यांसाठी खूप प्रेरणादायी ठरले असून, यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना सायबर क्राईम आणि सामाजिक समस्या याबद्दल जागरूकता मिळाल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.