Home चंद्रपूर आनंदाची बातमी :-चंद्रपुरातील पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कातील 57 स्वॅब नमुन्यापैकी सर्व 57 नमुने...

आनंदाची बातमी :-चंद्रपुरातील पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कातील 57 स्वॅब नमुन्यापैकी सर्व 57 नमुने निगेटिव्ह!

पॉझिटीव्ह रुग्णाची प्रकृती स्थिर ; प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये रुग्ण नाही,उद्यापासून लॉक डाऊन मधे येणार स्थितिलता !

चंद्रपूर प्रतिनिधी – :

चंद्रपूर जिल्ह्यातील कृष्णनगर परिसरात आढळलेल्या एकमेव रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 57 नागरिकांची तपासणी करण्यात आली होती. काल यातील ८ नमुने प्रतीक्षेत होते. ते आठही नमुने प्राप्त झाले असून आता 57 पैकी 57 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. प्रतिबंधात्मक क्षेत्रामध्ये सुद्धा 10 मे रोजी केलेल्या पाहणीमध्ये कोणताही संशयित रुग्ण आढळलेला नाही.
जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत आज जारी करण्यात आलेल्या मेडिकल बुलेटीनमध्ये तीन वाजेपर्यंत आलेल्या सर्व अहवालाला समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामध्ये रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 89 लोकांची नोंद घेण्यात आली असल्याचे स्पष्ट केले आहे. या 89 लोकांपैकी 57 नागरिकांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. हे सर्व नमुने निगेटिव्ह आले असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत यांनी कळविले आहे. या पॉझिटिव्ह रुग्णाच्या परिवारातील तीनही अहवाल यापूर्वीच निगेटिव्ह आले आहे.
दरम्यान, प्रतिबंधित क्षेत्रामध्ये महानगरपालिका आरोग्य विभागाच्या 47 चमू कार्यरत आहे. यांनी 10 मे रोजी या प्रतिबंधित क्षेत्रातील 2 हजार 152 घरांमध्ये राहणाऱ्या 8 हजार 540 नागरिकांचे सर्वेक्षण केले. यामध्ये अतिगंभीर श्वसनाचा आजार असणारे 7 रुग्ण संशयित होते. मात्र त्यांचा देखील यासंदर्भातील अहवाल निगेटिव्ह आला आहे.
जिल्ह्यातील कोरोना संदर्भातील ताजी आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. जिल्ह्यांमध्ये आत्तापर्यंत १९६ लोकांची स्वॅब तपासणी करण्यात आली होती. यापैकी कृष्ण नगर येथील रुग्णांचा एकमेव अहवाल पॉझिटिव्ह आला होता. 196 पैकी आता फक्त दोन अहवाल प्रतीक्षेत आहे.
जिल्ह्यामध्ये चंद्रपूर महानगर क्षेत्रांमध्ये संस्थात्मक अलगीकरण करण्यात आलेले १४२, तालुका स्तरावर संस्थात्मक अलगीकरण करण्यात आलेले 93 तर एकूण रूग्ण संख्या 235 आहे.
जिल्ह्यांमध्ये आत्तापर्यंत गृह अलगीकरण केलेल्या रुग्णांची संख्या 51 हजार 976 आहे. यामध्ये ग्रामीण भागात सर्वाधिक 44 हजार 149, महानगरपालिका क्षेत्रात 3,253 तर जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रामध्ये 4 हजार 574 व्यक्तींना गृह अलगीकरण करण्यात आले आहे. सध्या 14 हजार 701 नागरिक गृह अलगीकरणात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here