Home चंद्रपूर अजब गजब :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चंद्रपूर विभागात सावळा गोंधळ...

अजब गजब :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चंद्रपूर विभागात सावळा गोंधळ ?

 

एकाच गुन्ह्यात वेगवेगळ्या शिक्षाकुणाची पगारवाढ रोखली तर कुणाला बडतर्फीच्या अनुषंगाने कारणे दाखवा.

तक्रार निवारण अधिकाऱ्यांचा गजबच्या  कारभारामुळे कर्मचाऱ्यांत असंतोष?

चंद्रपूर :- भारतीय संविधान नागरिकांना समान अधिकार देते त्याचप्रमाणे राज्यघटनेप्रमाणे प्रत्येक गुन्ह्यात विशिष्ट शिक्षेचे प्रावधान असुन त्यानुसार व्यक्तिसापेक्ष शिक्षा देण्याचे स्पष्ट निर्देश आहेत. अशाचप्रकारे कुठल्याही आस्थापनेवर कार्यरत कर्मचाऱ्यांनी नियमबाह्य कार्य केल्यास देण्यात येणारी शिक्षा व्यक्तीकडे बघुन नव्हे तर गुन्हा बघुन देण्यात यावी अशी तरतुद असतेच.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चंद्रपूर विभागीय आगारात मात्र नैसर्गिक न्यायाचे व समानतेचे तत्त्व धुडकावून कर्मचार्‍यांना मनमर्जीने शिक्षा ठोठावण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असुन संबंधित तक्रार निवारण अधिकाऱ्यांच्या लहरी निर्णयाने कर्मचाऱ्यांत असंतोष पसरला आहे.

सविस्तर वृत्त असे की, चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागु असताना बरेचदा महामंडळाच्या बसमधून दारूची अवैध वाहतुक होत असल्याची ओरड व्हायची. कित्येकदा प्रवासी तर बरेचदा महामंडळाचे चालक वाहक सुद्धा अवैध दारू वाहतुक करताना पकडल्या गेले आहेत. जे कर्मचारी अवैध दारू वाहतुक करताना पकडल्या गेले त्यांच्यावर महामंडळाने आपल्या नियमाप्रमाणे चौकशी करून कारवाई केली.

मात्र ही कारवाई करताना कर्मचार्‍यांना सापत्न वागणुक देण्यात आल्याचे सिद्ध होत असुन मर्जीतील कर्मचार्‍यांना सौम्य तर इतर कर्मचार्‍यांना कठोर शिक्षा सुनावल्याचे प्रकार समोर आले आहे. ह्यापैकी एका प्रकरणात एकाच दिवशी एकाच मार्गावर बहुतेक एकाच पथकाद्वारे महामंडळाच्या बसची तपासणी करण्यात आली. चंद्रपूर ते आदीलाबाद ह्या आंतरराज्य बस फेरी दरम्यान झालेल्या तपासणीत एकाच दिवशी 2 बसचे चालक अवैध दारू वाहतुक करताना आढळून आले. ह्यापैकी एका चालकावर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला तर दुसऱ्यावर असा गुन्हा नोंदविण्यात आला नाही. महत्वाचे म्हणजे दोन्ही प्रकरणात अडकलेले हे चालक भाऊ भाऊ असुन एकाला असेच सोडणे व दुसऱ्यावर पोलीस तक्रार करणे हे अन्यायकारक असुन नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाला हरताळ फासणारे आहे हे प्रथमदृष्ट्या सिद्ध होत असुन अशा प्रकारे निर्णय घेणार्‍या अधिकाऱ्यांवरच कारवाई होणे गरजेचे आहे.

त्यातल्यात्यात सदर प्रकरणात जप्त केलेला दारुसाठा पोलीस अथवा अबकारी विभागाच्या ताब्यात देणे आवश्यक असुनही संबंधित अधिकार्‍यांनी ती दारू नियमबाह्य पद्धतीने स्वतःच्या ताब्यात ठेवण्यात आला. वस्तुतः दारू पिणे आणि दारू बाळगणे हा गुन्हा असुन त्यातल्यात्यात चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असताना अवैधपणे दारू ताब्यात ठेवणे गंभीर गुन्हा असुन असे करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का हे पाहणे आवश्यक आहे.

एव्हढेच नाही तर ह्याच प्रकरणात MH07 C 9156 क्रमांकाच्या बसचा चालक असलेल्या व दारूची अवैध वाहतुक करताना पकडल्या गेलेल्या एका भावाची 3 वर्षाची भावी पगारवाढ रोखण्यात आली असुन अशाच प्रकारच्या इतर प्रकरणातील बर्‍याच कर्मचार्‍यांना थेट बडतर्फीची कारवाई का करण्यात येऊ नये अशा आशयाची करणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे मात्र केवळ ह्या प्रकरणातील आरोपीला भावी 3 वर्षाची पगारवाढ रोखण्याचे आदेश देण्यात आले.

ह्या प्रकारच्या पक्षपाती कारवाईमुळे सदर चालक तक्रार निवारण अधिकारांच्या खास मर्जीतील आहे की त्या ठिकाणी काही अर्थपुर्ण कारणे आहेत ह्याचाही शोध घेणे गरजेचे असुन अशा न्याय निवाड्यामुळे महामंडळाच्या कर्मचाऱ्यांत असंतोष पसरला असुन कर्तव्यकठोर विभागीय नियंत्रक काय कारवाई करतात ह्याकडे कर्मचाऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here