Home चंद्रपूर धक्कादायक :- चंद्रपूर जिल्ह्य़ातील आदिवासी आश्रमशाळांमधे कोरोना नियमांचे उल्लंघन?

धक्कादायक :- चंद्रपूर जिल्ह्य़ातील आदिवासी आश्रमशाळांमधे कोरोना नियमांचे उल्लंघन?

 

नाशिक जिल्ह्यात आश्रमशाळेत १५ विद्यार्थ्याना कोरोना लागण झाल्यानंतरही प्रशासन ढिम्म?

चंद्रपूर प्रतिनिधी :-

नाशिक जिल्ह्यातील मुंढेगाव येथील आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेतील १५ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली असताना चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व आदिवासी आश्रम शाळांमध्ये कोरोना बाबत शिस्तबद्ध नियम पाळणे आवश्यक होते.  मात्र आदिवासी विकास विभागाने वसतिगृहात व निवासी शाळांमध्ये कोरोना नियमाचे तीन तेरा वाजवून विद्यार्थ्याच्या आरोग्याशी जणू खेळ चालविला असल्याचे धक्कादायक चित्र सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळांमधे बघावयास मिळत आहे. या गंभीर प्रकरणी शासनस्तरावर काय निर्णय होईल तो होईल पण एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांनी नाशिक सारखा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात होऊ नये याकरिता कठोर पावले उचलावी अशी मागणी सर्वत्र होऊ लागली आहे.

कोरोनाच्या तब्बल दोन वर्षाच्या काळानंतर महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने राज्यातील शासकीय आश्रम शाळा सुरू केल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्य़ात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर व चिमूर अंतर्गत येत असलेल्या सर्व निवासी आश्रमशाळा पुर्ण विद्यार्थी क्षमतेने सुरू आहे. मात्र महाराष्ट्र शासनाने व केंद्र सरकारने नव्यानेच जारी केलेल्या कोवीड नियमांचे सर्रासपणे शासकीय आदिवासी आश्रम शाळांमध्ये उल्लंघन होतांना दिसत आहे.महत्वाची बाब म्हणजे याकडे जाणिव पुर्वक वरिष्ठ अधिकारी व प्रशासनाचे दुर्लक्ष करीत आहे. नियमानुसार  शाळा दोन सत्रामध्ये सुरू करण्याची मुभा दिली असून प्रत्येकी बाकावर एक विद्यार्थी आणि दोन बाकांमध्ये 6 फुट अंतर गरजेचे आहे, मात्र निवासी शासकीय आदिवासी आश्रम शाळेत राजरोसपणे एका बाकावर चक्क तीन विद्यार्थी बसविले जात आहे. तसेच सर्व विद्यार्थी निवासी असल्यामुळे विद्यार्थी वसतीगृहात एकत्र राहतात.जर शाळेत दोन विद्यार्थ्यांच्या बाकांमध्ये 6 फुट अंतर गरजेचे आहे. तर हाच नियम वसतीगृहात लागु नाही काय? तसेच 20 विद्यार्थ्यांच्या मागे एक शौचालय असणे गरजेचे असतांना काही शाळेत अपुरी व्यवस्था आहे त्यामुळे विद्यार्थ्यांची चांगलीच गैरसोय होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून येणाऱ्या अडचणींचा विद्यार्थ्यांना चांगलाच सामना करावा लागत आहे.

खरं तर आश्रमशाळेतील विद्यार्थी कोरोना च्या दशहतीमध्ये शिकत आहे, मात्र कोरोना नियमांचे पालन न करता विद्यार्थ्याना पाहिजे त्या सोई सूविधा पुरविल्या जात नाही. आदिवासी विकास विभागाच्या नियोजन शुन्य कार्यप्रणालीवर आता जिल्हा प्रशासन काही कारवाई करणार की नाही? अशा विद्यार्थ्याच्या पालकांना प्रश्न पडला आहे. परंतु  स्थानिक जिल्हा प्रशासन याकडे डोळेझाक करत असल्याने नाशिक जिल्ह्यातील आश्रम शाळेत झालेल्या घटनांची पुनरावृत्ती चंद्रपूर जिल्ह्यात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?असा प्रश्न आता उभा ठाकला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here