Home Breaking News धक्कादायक :- बारावी बोर्डाचा केमिस्ट्रीचा पेपर फुटला कोचिंग क्लासेसच्या शिक्षकाला अटक.

धक्कादायक :- बारावी बोर्डाचा केमिस्ट्रीचा पेपर फुटला कोचिंग क्लासेसच्या शिक्षकाला अटक.

राज्यात नौकर भरती परीक्षेसह बारावीचा पेपर फुटल्याने उडाली खळबळ.

न्यूज नेटवर्क :-

राज्यात नुकत्याच सुरू असलेल्या बारावी बोर्डाचा केमिस्ट्रीचा पेपर फुटला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून या प्रकरणी कोचिंग क्लासेसच्या शिक्षकाला अटक केली आहे. या शिक्षकाने बारावी केमिस्ट्रीचा पेपर आपल्या विद्यार्थ्यांना दिल्याची माहिती समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वी राज्य सरकारच्या नोकरभरतीत पेपरफुटी झाल्याचे समोर आले होते. आता, थेट बारावीच्या परीक्षेचा पेपर फुटला असल्याचे समोर आले आहे. शनिवारी बारावीचा केमिस्ट्रीचा पेपर झाला होता. मात्र, परीक्षेआधीच हा पेपर विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर आला होता. मालाडमधील खाजगी क्लासेसच्या शिक्षकाला या प्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी अटक केली. मुकेश यादव असं या खाजगी क्लासेस चालवणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. या खाजगी शिक्षकाने आपल्या वर्गात शिकत असलेल्या तीन विद्यार्थ्यांना व्हाट्स अॅपवर हा पेपर सुरू होण्याआधीच दिला असल्याची माहिती मिळाली आहे.

या पेपर फुटी प्रकरणी पोलिसांनी तीन विद्यार्थ्यांची चौकशी देखील केली आहे. पेपरफुटीसाठी मुकेश यादवसोबत आणखी कोणाच सहभाग आहे का, पेपर मिळवण्यासाठी काही आर्थिक व्यवहार झाला का, याआधीदेखील पेपर फुटलेत का, आदी मुद्यांवरही पोलीस तपास सुरू आहे. पोलिसांकडून आता या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. फुटलेला केमिस्ट्रीचा पेपर किती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचला याची माहितीदेखील पोलीस घेत आहेत. प्राथमिक माहितीनुसार फक्त तीन विद्यार्थ्यांना हा पेपर मिळाला आहे. बारावी विज्ञान शाखेतील पेपरफुटीचे प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली आहे. बारावीच्या इतर पेपरदेखील फुटले का, याची चौकशी ही करण्यात येत आहे. इतर पेपरही फुटले असल्यास त्याची व्याप्तीही मोठी असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी केली जात असून इतर बाबींच्या अनुषंगाने तपास करण्यात येत आहे.

लातूरमध्ये सुद्धा एमबीबीएसचा पेपर फुटला

नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने सध्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या (MBBS Exam) हिवाळी परीक्षा सुरू आहेत. या परीक्षेत एमबीबीएसच्या द्वितीय वर्ष अभ्यासक्रमाच्या मायक्रोबायलॉजीचा पेपर फुटला असल्याचे समोर आले. हा पेपर अगदी जसाच्या तसा नोव्हेंबरमध्ये महाविद्यालयात घेण्यात आलेल्या सराव परीक्षेत आला होता. मायक्रोबायोलॉजी या विषयाचा पेपर तयार करण्याची जबाबदारी महाविद्यालयातील संबंधित प्राधापकांना दिली होती. मात्र, प्राध्यापकांकडूनच हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. तरी, तात्पुरती ही परीक्षा रद्द करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here