प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झालेल्या जया श्रावण बगडे महाराष्ट्र वनसेवा 2021 च्या स्पर्धा परीक्षेत अनुसूचित जमातीत मुलींमधून राज्यात तिसरी.
वरोरा प्रतिनिधी :-
नुकताच, महाराष्ट्र वनसेवा 2021 च्या स्पर्धा परीक्षेचा निकाल हाती आला असता वरोरा शहराला लागून असलेल्या ग्रामपंचायत बोर्डा,द्वारका नगरी येथे वास्तव्यास असलेल्या जया श्रावण बगडे यांनी महाराष्ट्र वनसेवेच्या स्पर्धा परीक्षेत अनुसूचित जमाती या मुलींच्या प्रवर्गातून राज्यातून तिसरी तर याच परीक्षेत घेण्यात आलेल्या तोंडी मुलाखत परीक्षेत राज्यात मुलींमध्ये प्रथम क्रमांकाने येण्याचा मान मिळविला आहे,त्यांची वनपरिक्षेत्र अधिकारी या पदावर निवड झाली आहे,
जया श्रावण बगडे यांचे प्राथमिक शिक्षण आनंदवन तसेच टेमुर्डा येथील जिल्हा परिषद शाळेत झालेले आहे तर विद्यालयीन व महाविद्यालयीन शिक्षण लोकमान्य कन्या विद्यालय तसेच आनंदनिकेतन कॉलेज वरोरा येथे झाले. पुढे आय. टी. मध्ये पॉलीटेक्निक डिप्लोमा प्राप्त करीत कम्प्युटर सायन्स मध्ये अभियांत्रिकीची पदवी संपादन केली. दरम्यान स्पर्धा परीक्षेची ओढ,बाळकडू घरातूनच मिळाले आणि त्या दिशेने वाटचाल करीत चिकाटी,जिद्द,आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी 2021 मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र वनसेवेच्या स्पर्धा परीक्षेत अनुसूचित जमाती मुलींमधून तिसरे स्थान प्राप्त केले आहे,जया श्रावण बगडे यांची मोठी बहीण ही सुद्धा स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करीत नागपूर येथील धंतोली मनपा प्रशासनात सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत आहे,
सामान्य कुटुंबात जन्मलेल्या जया बगडे यांचे वडील मुख्याध्यापक होते,तर आई गृहिणी आहे. सामान्य कुटुंबातून संघर्ष करीत कुठल्याही विशेष कोचिंगची व्यवस्था नसताना त्यांनी मिळवलेले यश कौतुकास पात्र ठरत असून समाजातील मुलींसाठी प्रेरणास्थान ठरत आहे त्यांच्या या यशाचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. या दरम्यान या यशाचे श्रेय त्यांनी प्रा. विशाल भेदुरकर,सचिन जगताप सर,प्राध्यापक वैभव राऊत तसेच आई-वडील,तीन मोठ्या बहिणी व भाऊजी यांना दिले आहे.