अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी
चंद्रपूर :- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या बुधवार, दि. ५ जुलै रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या अनुषंगाने गोंडवाना विदर्भ मुक्ती संघटनेच्या वतीने महामहीम राष्ट्रपती यांच्याकडून चंद्रपूर व गडचिरोली आदिवासी बांधवांच्या विविध समस्यांकडे एका पत्रातून लक्ष वेधले आहे. केंद्र व राज्य शासनामार्फत या समस्यांवर उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणीही या पत्रातून करण्यात आली आहे.
दोन्ही जिल्ह्यातील आदिवासी समाजासोबत इतरही विद्यार्थ्यांना उच्च गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा लाभ घेता यावा, यासाठी गोंडवाना विद्यापिठाच्या जागेवर केंद्र शासनामार्फत संचालित
ट्रायबल युनिव्हर्सिटीची स्थापना करावी. शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्याकरिता आणि शिक्षणाच्या नावावर व्यापार करणाऱ्या शिक्षण संस्थांवर अंकुश लावण्याकरिता शिक्षण विभागाला जिल्हा परिषदेमधून वगळून राज्य शासनामार्फत स्वावलंबी शिक्षण विभागाची स्थापना प्रत्येक जिल्ह्यात करावी. त्यांच्यासाठी राज्य शासनामार्फत आयएएस दर्जाचे अधिकारी नियुक्त करावे, याकडे
पत्रातून लक्ष वेधण्यात आले. जिल्हा परिषद शाळेमध्ये अल्पवयीन आदिवासी मुलींवर काही त्यांच्यात घरीच रिसॉर्ट बनविण्यासाठी शिक्षकांमार्फत लैंगिक अत्याचार करण्याची अनेक घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडली. अशा घटना थांबविण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी. व्हिलेज टुरिझम वाढविण्यासाठी आदिवासी लोकांना राज्य शासनामार्फत उपाययोजना करण्यात यावी.
यामुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये गरीब आदिवासी लोकांना याचा लाभ मिळेल. पर्यटकांना आदिवासी संस्कृती समजणे सोयीस्कर होईल. गरीब आदिवासींना रोजगार उपलब्ध होईल. शिक्षणाचा अधिकार असताना खासगी शिक्षण संस्था गरीब वर्गाला शिक्षणापासून वंचित ठेवत आहे. यावर उपाययोजना करावी, अशी मागणी महेंद्र दशरथ पेंदाम, गजानन वेलके, कांताबाई कुळमेथे, शंकर सिडाम, सतीश सिडाम, बचन सिडाम, जीवनदास किन्नाके, महेंद्र पेंदाम, अहिल्याबाई गेडाम, विश्वनाथ शेडमाके, अजय नैताम, अहिल्याबाई येरमे, श्रीरंग वेलादी, नितेश कन्नाके, रूपाबाई पेंदाम आदींनी केली आहे.