अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी
गर्दीमुक्त वातावरणात करता येणार गणेश मूर्तींची खरेदी
वाहतुक व्यवस्था सुरळीत राहण्यास होणार मदत
चंद्रपूर :- दि, २१ ऑगस्ट – उत्सव काळात श्री गणेश मूर्ती दुकानांवर होणाऱ्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये व नागरिकांना सहजतेने मूर्ती खरेदी करून घरी नेता याव्या या दृष्टीने चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे ०४ ते ०७ सप्टेंबर दरम्यान चांदा क्लब येथे श्री गणेश मूर्ती प्रदर्शनी व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे.
येत्या ७ सप्टेंबर पासुन गणेशोत्वास सुरवात होत असुन मोठ्या प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या या उत्सवात अधिकांश घरी गणेश मूर्तींची स्थापना केली जाते. मूर्ती विक्री करणारे अनेक मूर्तिविक्रेते हे शहरातील वर्दळीच्या ठिकाणी गणेशमूर्तीची विक्री करत असल्याने नागरिकांना मूर्ती खरेदीस गर्दीच्या ठिकाणी जाण्याशिवाय पर्याय नसतो.
यावेळी खरेदीस नागरिकांची गर्दी, वाहनांची गर्दी, खरेदीस पुरेसा वेळ न मिळणे, दुचाकी वाहन सोबत असेल तर वाहन उभे करायला जागेचा प्रश्न,चारचाकी वाहन असेल तर सुरक्षित जागी वाहन उभे करून खरेदीस दूर पायी चालत जावे लागते.सोबत परिवाराचे सदस्य असतील तर खरेदी करतांना होणारा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागतो.
यावर उपाय म्हणुन यावर्षी मनपाने चांदा क्लब येथील प्रशस्त मैदानावर मूर्तिकारांना मूर्तिविक्रीसाठी जागा उपलब्ध करून दिली असुन त्यामुळे नागरिकांना एकाच जागी मातीच्या गणेश मूर्तीची अनेक दुकाने उपलब्ध होणार आहे. येथे प्रत्येक विक्रेत्यासाठी १० बाय १२ आकाराच्या स्टॉल्सची उभारणी केली जाणार असुन विद्युत व्यवस्था,मंडप, फिरते शौचालय,प्रशस्त वाहन पार्कींग व्यवस्था व पूजा साहित्य व सजावट साहित्यांचीही दुकाने येथे उपलब्ध असणार आहेत. बचतगट व इतर मार्फत खाद्यपदार्थांचे स्टॉल्स उभारण्यात येणार असल्याने संपुर्ण प्रदर्शनीला आनंद मेळाव्याचे स्वरूप येणार आहे. त्यामुळे नागरिकांना इतरत्र कुठेही गर्दीच्या जागी न जाता मोकळ्या जागेत आपल्या परिवारासहित खरेदीचा आनंद घेता येणार आहे.
मूर्तिविक्रेत्यांना स्टॉल्ससाठी गुरुवार २६ ऑगस्ट पासुन नोंदणी करता येणार असुन राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान कार्यालय व झोन ३ कार्यालय येथे नोंदणी कार्यालय सुरु करण्यात येत आहे. ७३९१०४२४५१,७३९१०४२४५० या क्रमांकावर संपर्क करूनसुद्धा नोंदणी करता येणार आहे.गर्दीमुक्त मोकळ्या वातावरणात श्री गणेशाचे आगमन होण्याच्या दृष्टीने नागरिकांनी चांदा क्लब येथुन मूर्ती खरेदी करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.
#ganeshotsav #ganeshotsav2024 #chandaclub #crowdfree #chandrapur #CMC #cmcommissioner