भाजप चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्षपदी सुभाष कासनगोट्टीवार यांची निवड…..
कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचा जल्लोष, ढोल-ताशांच्या गजरात जोरदार स्वागत
चंद्रपूर :- भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्षपदी निष्ठावान आणि अनुभवी कार्यकर्ते सुभाष कासनगोट्टीवार यांची नियुक्ती झाल्यानंतर संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचा आणि उत्साहाचा वातावरण तयार झाले आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने एका समर्पित, वर्षानुवर्षे पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यावर विश्वास दाखवून ही नियुक्ती केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य संचारले आहे.
News reporter :- अतुल दिघाडे
सुभाष कासनगोट्टीवार हे गेल्या अनेक दशकांपासून भाजपमध्ये कार्यरत असून, त्यांनी स्थानिक स्तरावर पक्षाची मुळे रुजवण्यासाठी अपार मेहनत घेतली आहे. साधेपणा, जनसंपर्क आणि संघटन कौशल्य यामुळे ते कार्यकर्त्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. त्यांच्या निवडीनंतर जेव्हा ते प्रथमच घरी परतले, तेव्हा कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत, हार-फुलांनी आणि घोषणांनी त्यांचे भव्य स्वागत केले.
“सुभाष कासनगोट्टीवार यांचा विजय असो”, “भाजप चंद्रपूर जिल्हाध्यक्ष की जय”, अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. महिलांनी रांगोळ्या काढून त्यांच्या आगमनाचे स्वागत केले. अनेक कार्यकर्ते त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू घेऊन या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार ठरत होते. स्वागतासाठी शहराच्या विविध भागांतून कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
ही निवड केवळ सुभाष कासनगोट्टीवार यांच्या वैयक्तिक कार्याचा सन्मान नाही, तर पक्षाच्या ज्या कार्यकर्त्यांनी अनेक वर्षे निःस्वार्थ सेवा केली, त्यांचा सन्मान असल्याचे मत अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. भाजपमध्ये “जुना सोना” ही संकल्पना आज प्रत्यक्षात उतरली आहे.
चंद्रपूरच्या भाजप राजकारणात सध्या दोन गट असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे – एक गट आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली आहे, तर दुसरा गट आमदार किशोर जोरगेवार यांच्याशी संलग्न आहे. सुभाष कासनगोट्टीवार हे जोरगेवार यांचे जवळचे सहकारी मानले जातात. त्यामुळे त्यांच्या निवडीत किशोर जोरगेवार यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
कार्यकर्त्यांमध्ये नवसंजीवनी
या नियुक्तीमुळे जुन्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा पक्षात सन्मान मिळू शकतो, असा विश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळे नव्या आणि जुन्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय निर्माण होऊन पक्ष संघटन अधिक बळकट होईल, असा आशावाद व्यक्त करण्यात येतो आहे.
कार्यकर्त्यांच्या या प्रेमामुळे भारावून गेलेले सुभाष कासनगोट्टीवार यांनी आपल्या भाषणात सांगितले की,
“पक्षाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी कृतज्ञ आहे. ही जबाबदारी माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. चंद्रपूरच्या विकासासाठी, कार्यकर्त्यांच्या हक्कासाठी आणि पक्षाची वाढण्यासाठी मी अखेरचा श्वास असेपर्यंत प्रामाणिकपणे झटत राहील.”
ते पुढे म्हणाले,
“ज्या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी आयुष्य वेचले, त्यांच्या योगदानाचा विसर पडू देणार नाही. नवीन कार्यकर्ते आणि जुने कार्यकर्ते एकत्र येऊन आम्ही चंद्रपूर भाजपला एक मॉडेल संघटना बनवू.”