“त्या हातांनी सजवले वर्ग… आणि आज तेच हात ठरले परीक्षक!”
छोटूभाई पटेल हायस्कूल, चंद्रपूर येथे वर्ग सजावट उपक्रमात माजी विद्यार्थ्यांचा सहभाग
चंद्रपूर :- जी शाळा कधी काळी शिक्षणाचे देणे देणारी होती, जिथे ज्ञानाच्या सोबतीने वर्ग सजावटीसारखे उपक्रम अनुभवले गेले – त्या शाळेत आज माजी विद्यार्थी परीक्षक म्हणून परतले आणि आठवणींच्या सागरात न्हालो गेले.
News reporter :- अतुल दिघाडे
छोटूभाई पटेल हायस्कूल, चंद्रपूर येथे शैक्षणिक सत्र 2025-26 निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही “वर्ग सजावट उपक्रम” मोठ्या उत्साहात पार पडला. या उपक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे, यंदा या सजावटीचे परीक्षण करण्यासाठी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनाच निमंत्रित करण्यात आले होते.
सुमारे तीस वर्षांपूर्वी ज्या हातांनी रंग, कात्र्या, पोस्टर्स, आणि क्रिएटिव्ह कल्पनांनी वर्ग सजवले होते, तेच हात आज परीक्षणासाठी पुढे सरसावले. या अनोख्या अनुभवामुळे माजी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. शाळेशी असलेल्या आठवणींना उजाळा देताना अनेकांच्या डोळ्यांत नकळत ओल आली.
या परीक्षकांच्या यादीत परवीन पठाण, सागर कुंदोजवार, जितेंद्र मशारकर, शाम कोतंमवार आणि विशाल वाटेकर यांचा समावेश होता. त्यांनी विविध वर्गांची सर्जनशीलता, मांडणी आणि सादरीकरण याचे बारकाईने परीक्षण करून त्याचा अहवाल मुख्याध्यापिका सौ. कांत मॅडम यांच्याकडे सादर केला.
यावेळी माजी विद्यार्थी संघातर्फे आशिष धर्मपुरीवार, पराग जवळे, अभिषेक आचार्य, धीरज साळुंके, चंद्रकांत कोतपल्लीवार, प्रफुल्ल देमेवार यांनी उपक्रमाच्या आयोजनात मोलाचे सहकार्य केले.
हा सन्मान आणि जिव्हाळ्याचा क्षण दिल्याबद्दल सर्व माजी विद्यार्थ्यांनी शाळेचे संचालक श्री. जितेनभाई (लोटी) पटेल, मुख्याध्यापिका सौ. कांत मॅडम आणि उपमुख्याध्यापक मानकर सर यांचे विशेष आभार मानले.
वर्ग सजावटीच्या माध्यमातून केवळ भिंतीच नव्हे, तर आठवणीही सजल्या… आणि या सजावटीचा परीक्षक होणे ही माजी विद्यार्थ्यांसाठी आयुष्यभराची आठवण बनून राहिली.