ताडोबा रोडवरील डावरा वाईनशॉपवर कडक कार्यवाहीची मागणी; राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक
चंद्रपूर, दि. २५ ऑगस्ट :- चंद्रपूर शहरातील वाईनशॉपच्या अवैध कारभाराला आळा घालावा, या मागणीसह राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे. ताडोबा रोडवरील डावरा वाईनशॉपमध्ये थेट वाईनशॉप शेजारीच दारू पिण्याची व्यवस्था करण्यात येत असल्याचा आरोप करत युवक काँग्रेसच्या वतीने याविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे.
News reporter :- अतुल दिघाडे
१६ जून २०२५ रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेस चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष अभिनव देशपांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्पादन शुल्क विभागाचे मा. अधीक्षक यांना निवेदन दिले होते. या निवेदनात वाईनशॉप चालकांकडून शासन नियमांचे सर्रास उल्लंघन होत असून, वाईनशॉप परिसरातच ग्राहकांसाठी दारू पिण्याची गैरकायदेशीर सोय करून दिली जात असल्याचे नमूद करण्यात आले होते.
या निवेदनानंतर उत्पादन शुल्क विभागाने “स्पॉट व्हेरिफिकेशन” करून कोणताही अवैध प्रकार आढळून आला नसल्याचे सांगितले. परिणामी कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. मात्र, वास्तविक परिस्थिती पाहता, डावरा वाईनशॉप परिसरात खुलेआम दारू सेवन होत असल्याचे स्पष्ट दिसत असल्याचा पुनरुच्चार युवक काँग्रेसने केला आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रतिनिधींनी पुन्हा एकदा अधीक्षकांची भेट घेऊन त्यांना प्रत्यक्ष ठिकाणी दारू सेवन होत असल्याचे विडिओ पुरावे सादर केले. विडिओ पाहिल्यानंतर अधीक्षकांनी कार्यवाहीचे आश्वासन दिले, मात्र आजअखेर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, अशी माहिती युवक काँग्रेसने दिली.
यासंदर्भात युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचा इशारा देण्यात आला आहे. जर लवकरात लवकर कार्यवाही झाली नाही, तर युवक काँग्रेसकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
चंद्रपूर शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व शासन नियमांचे पालन करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तत्काळ पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केली आहे.