यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने जागतिक महिला दिनाचे आयोजन, विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणा-या महिलांचा सत्कार
चंद्रपूर प्रतिनिधी
चंद्रपूर आजचे युग महिलांचे आहे. परिवार सांभाळून स्वतःसाठी जगा. पूर्णत: इतरांवर अवलंबून न राहता महिलांनी आज परिवाराचा आर्थिक आधार बनण्याची गरज आहे. आजवर परिवार सांभाळण्यासाठी आपण कष्ट केले. आता आर्थिक सक्षम होण्यासाठी लेकिंनो कष्ट करा आणि आत्मसन्मानाने जगा असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री गंगुबाई उर्फ अम्मा जोरगेवार यांनी केले.
यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने कार्यालयात जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणा-या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, डॉ. रिमा निनावे, हिमांगीनी बिश्वास, सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा जोशी आदी मान्यवरांची मंचावर मंचावर उपस्थिती होती.
या कार्यक्रमात बोलताना गंगुबाई उर्फ अम्मा म्हणाल्या कि, आज मुलगा आमदार झाला असला तरी त्याने कष्ट करणे सोडले नाही. हीच आम्ही परिवाराला दिलेली शिकवण आहे. कारण कष्ट आणि प्रामाणिकता हाच यशाचा खरा मुलमंत्र असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या. मुलगा निवडून आल्या नंतर माझ्या सांगण्यावरुन यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने अम्मा का टिफीन हा उपक्रम आम्ही सुरु केला. यातून दररोज आम्ही जवळपास 200 लोकांना जेवणाचा टिफीन घरपोच पाठवतो. फुटपाथ वर टोपल्या विकत परिवाराचा सांभाळ केला. पैसे कमी होते. मात्र संस्कार कधीही कमी पडू दिले नाही. बाल वयात मुलांवर तुमचे होत असलेले संस्कारच तुमचे आणि पर्यायाने तुमच्या परिवाराचे भविष्य ठरवतील असेही त्या यावेळी म्हणाल्या. माझ्या कार्याची समाज दखल घेईल असा कधीच विचार केला नव्हता. मात्र समाज जागृत आहे. त्यामुळेच आज या टोपल्या विकणाऱ्या अम्माचा वेगवेगळ्या संस्था सत्कार करतात. आज माझा मुलगा आमदार झाला म्हणून माझा सत्कार होतोय असे नाही. त्यांच्यावर जे संस्कार झाले त्यामुळे हे सत्कार आहे. असे मानणारी मी आहे. असेही त्या यावेळी म्हणाल्या.
या कार्यक्रमात आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळविणाऱ्या अनिता बोबडे, आयुर्वेदाचार्य तथा योग शिक्षिका ज्योती मसराम, नासा मध्ये जाण्याची संधी प्राप्त करणारी 10 कक्षाची विद्यार्थी निशिता खाडिलकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे. या कार्यक्रमात मान्यवारांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत जागतिक महिला दिनाचे महत्व सांगितले. सदर कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-र्यांसह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.