अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला लिकर असोसिएशनने दिले होते न्यायालयात आव्हान
चंद्रपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिलला जिल्ह्यातील सर्व दारूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले होते. या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती देत आदेश रद्द ठरविला आहे. त्यामुळे शुक्रवारी जिल्ह्यात दारूची दुकाने सुरूच होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आदेश काढून जिल्ह्यातील सर्व दारूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जारी केले होते, या आदेशाविरोधात चंद्रपूर लिकर असोसिएशनचे अध्यक्ष राजू मारकवार यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला आव्हान दिले. यावर सुनावणी करताना न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांनी आदेश एमडब्ल्यू चांदवानी यांच्या खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला स्थगिती देत रद्द ठरविला आहे. त्यामुळे आंबेडकर जयंतीदिनी जिल्ह्यातील सर्वच देशी, विदेशी, बार व रेस्टॉरंट सुरू आहेत. विशेष म्हणजे रामनवमी महोत्सव तथा सागवान लाकूड शोभायात्रादिनी चंद्रपूर व बल्लारपूर शहरातील देशी-विदेशी दारू दुकाने बंद होती. मात्र, आंबेडकर जयंतीला दुकाने सुरू असल्याने नागरिकांकडून टीका होत आहे