अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी
पुणे :- राज्यात उशिराने पण दणक्यात आगमन केलेल्या मान्सूनने सध्या चांगलाच जोर धरला आहे. राज्याच्या बहुतांश भागात मान्सूनचा पाऊस सुरु झाला आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने मंगळवारी संपूर्ण राज्यात विशेषत: पुण्यात अतिमुसळधार पाऊस बरसण्याचा अंदा व्यक्त केला आहे. हवामान खात्याकडून काही सॅटेलाईट इमेज प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. पुण्यात सध्या पश्चिमेकडे जोरदार वारे वाहत असून मोठ्याप्रमाणावर ढग जमा झाले आहेत. त्यामुळे मंगळवारी पुण्यात मुसळधार किंवा अतिमुसळधार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अतिमुसळधार पावसाच्या काळात दृश्यमानता कमी होण्याची शक्यता आहे. तसेच जोरदार पावसामुळे रस्ते निसरडे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रस्त्यांवरुन वाहने सावकाश चालवावीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.याशिवाय, येत्या काही दिवसांमध्ये घाटमाथ्याच्या परिसरात फिरकू नये, असा सावधानतेचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे. घाटाच्या परिसरात अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. याशिवाय, या भागांमध्ये वाऱ्याचा वेगही जास्त असेल. पुणे शहरात सतत पाऊस पडल्यास सखल भागांमध्ये पाणी साचण्याचा धोका आहे. तसेच जोरदार वाऱ्यांमुळे झाडे उन्मळून पडण्याचीही शक्यता आहे, अशा सतर्कतेच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
उद्या मुंबईसह या जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट
२७ जून रोजी म्हणजेच मंगळवारी राज्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी पावसाचा अंदाज घेत घराबाहेर पडावं अशा सूचना देण्यात आल्या आहेत. पुढच्या २४ तासांमध्ये नाशिकसह पश्चिम महाराष्ट्रामध्ये अतिमुसळधार पाऊस होईल अशी शक्यता आहे. तर मराठवाड्यामध्येदेखील सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा हवामान खात्याचा इशारा आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झाल्यामुळे २७ आणि २८ जून रोजी राज्यात ऑरेंज आणि येलो अलर्ट असणार आहे तर महाराष्ट्रातील कोकणात आणि मध्य महाराष्ट्राच्या काही महत्त्वाच्या भागांमध्ये तर विदर्भातही अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.