अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी
चंद्रपूर :- मनसेच्या प्रदेश नेतृत्वाने दोन वर्षांपूर्वीच पदावरून उचलबांगडी केल्यानंतरही भरत गुप्ता हे जिल्हाध्यक्ष पदाचा गैरवापर करीत स्वत:ला जिल्हाध्यक्ष म्हणून मिरवित आहे. पक्षनेतृत्वाने चंद्रपुरात वाहतूक सेनेच्या नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मनसे वाहतूक सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदाशी भरत गुप्ता यांचा आता कोणताही संबंध नसून ते केवळ मनसेचे कार्यकर्ते आहेत. ते कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करीत आहेत, असा आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष मनदीप रोडे, राहुल बालमवार यांनी चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केला.
भरत गुप्ता यापूर्वी मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष होते. दोन वर्षांपूर्वी वाहतूक सेनेची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करून त्यांना पदमुक्त करण्यात आले. यानंतरही ते जिल्हाध्यक्ष पदाचा वापर करीत होते. दोन
महिन्यापूर्वी प्रदेश नेतृत्वावाने वाहतूक सेनेचे नवे पदाधिकारी जाहीर केले. यानुसार चंद्रपूर, बल्लारपूर आणि राजुरा या तीन विधानसभा क्षेत्रासाठी जिल्हा संघटक म्हणून महेश वासलवार यांची तर वरोरा, ब्रह्मपुरी आणि चिमूर या तीन मतदार संघाची जबाबदारी उमेश तिवारी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
मात्र, भरत गुप्ता समाजमाध्यमे तसेच होर्डिंग्जवर स्वत:चा उल्लेख मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष असा करीत असल्याने पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, गुप्ता केवळ मनसेचे कार्यकर्ते आहेत. ते जिल्ह्यात कोणत्याही पदावर नाही, असे बालमवार आणि रोडे यांनी स्पष्ट केले.
यानंतरही त्यांच्याकडून अनधिकृतपणे पदाचा गैरवापर होत राहिल्यास वरिष्ठांकडे तक्रार करू अशी माहिती अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला महेश वासलवार, उमेश तिवारी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.