Home वरोरा वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा घोटाळ्यांने अनेकांचे वांदे?

वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा घोटाळ्यांने अनेकांचे वांदे?

एकीकडे शेतकऱ्यांना अनुदानाचे पैसे परत मागू नका म्हणता व दुसरीकडे कांदा प्रकरणी कारवाई करा म्हणता भाजप नेत्याची ही कसली खेळी?

वरोरा प्रतिनिधी :-

भाजपच्या नेत्यांना मोदीया रोग झाला की काय ? हेच कळतं नाही कारण वस्तुस्थिती माहीत न करता व कुठलाही अभ्यास न करता केवळ भावनेच्या भरात व जनतेला खुश करण्यासाठी आणि चर्चेत राहण्यासाठी यांचा वाचाळपणा सुरू असतो. वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा घोटाळा प्रकरण घडलं, यात बाजार समितीचे सचिव यांच्यासह व्यापारी व काही राजकीय नेत्यांनी आपली पोळी शेकली आणि तब्बल 2 कोटी 30 लाख 78 हजार 375 रुपयांचं अनुदान शेतकऱ्यांच्या बैंक खात्यात जमा झाल्यानंतर त्यांच्याकडून टक्क्यांची वसुली सुरू केली असा आरोप आहे. दरम्यान कांद्याची लागवड न करता कांद्याचे अनुदान लाटणाऱ्या शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करू नये व त्यांची बैंक खाती गोठवू नये अन्यथा मी शेतकऱ्यांसाठी मोठे आंदोलन उभारेल व त्यासाठी यात गुंतलेले राजकीय नेते व बाजार समिती प्रशासन जबाबदार असेल असा इशारा एका भाजप नेत्यांनी स्वतःचा एक व्हीडिओ व्हायरल करून दिला. पण या भाजप नेत्यांना हे कळतं नाही की शेवटी घोटाळा हा घोटाळाचं असतो आणि भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालणे हा गुन्हा आहे, जर कांदा अनुदान प्रकरणी कारवाई झाली तर शेतकऱ्यांच्या बैंक खात्यात जमा झालेली रक्कम ही शासन परत घेणार नाही का? विशेष म्हणजे कांदा अनुदान लाटणारे सर्व शेतकरी हे वरोरा येथीलचं आहे का ? यांची कुठलीही शहानिशा न करता केवळ शेतकऱ्यांचा कैवार घेऊन त्यांच्याप्रती आपण किती संवेदनशील आहो हे दाखवण्याचा यांचा खटाटोप दिसतो आहे, जर शेतकऱ्यांप्रती एवढा कळवला आहे तर मग भाजप ची सत्ता असतांना व पावसाळी अधिवेशनात घोषणा झालेल्या अतिवृष्टी व पूरपीडित शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही ते अनुदान मिळवून द्यायला हे भाजप नेते पुढे का येतं नाही पण एखादा विषय सुरू आहे व त्यात सर्वचं राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आरोप केले व निवेदने दिली त्याबद्दल आपले आंदोलनाचे पवित्रे घ्यायचे नाटकं जे सुरू आहे ते आता येथील जनता पण समजून आहे.

मोदींनी राज्यात 70 हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी केल्याची आरोळी ठोकली आणि पुढच्या सात दिवसात तेच भ्रष्टाचारी भाजपच्या वॉशिंग मशीन मध्ये आले आणि तो घोटाळा नव्हताच अशी म्हणण्याची वेळ आली, याचा अर्थ भाजप कुठल्याही पक्षातील भ्रष्ट नेत्यांना हे भाजप मध्ये आणून त्यांना क्लीन चिट देतात तशीच परिस्थिती वरोरा येथील भ्रष्टाचार करणाऱ्या नेत्यांच्या बाबतीत कधीही घडू शकते. भाजप नेत्यांनी कांदा घोटाळा झाला तेंव्हा अगोदर त्याचा निषेध केल्यानंतर आता यांना साक्षात्कार झाला की कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बैंक खात्यातून पैसे परत घेऊ नये व त्यांची बैंक खाती गोठवू नये आणि तसा इशारा त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला. हा इशारा देण्यासाठी त्यांनी बाकायदा एक व्हीडिओ काढून तो व्हायरल केला. दरम्यान वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीने ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सिंचनाची व्यवस्था नाही, तसेच ज्यांच्या पीक पेऱ्यावर कांदा लागवडीची नोंद नाही, त्या शेतकऱ्यांच्या खात्यात सरसकट अनुदानाचे पैसे जमा केले आहे ते प्रशासन परत घेणारच आहे.

काय आहे पुरावे?

तालुक्यातील कळमगव्हाण या गावात ४५ शेतकऱ्यांना कांदा अनुदान मिळाले. यापैकी ९० टक्के शेतकऱ्यांच्या सातबारावर तलाठी, कृषी सहायक आणि ग्रामसेवक यांनी दिलेल्या अहवालानुसार कांद्याच्या पिकाची नोंदच नाही. त्यामुळे त्यांचे पंचनामे निरंक आले आहेत. हीच बाब वडगाव येथील शेतकऱ्यांच्या बाबतीत सुद्धा घडल्याने कांदा अनुदानात घोटाळा झाला हे आता सिद्ध होत आहे. त्यामुळे कांद्याच्या या घोटाळ्यामुळे अनेकांचे वांदे होणार हे निश्चित.

कांदा अनुदानातून गाव जेवण?

तालुक्यातील शेतकऱ्यांनी कांद्याचे पीक न घेताच आणि कांदा विक्रीचा चुकारा त्यांना न मिळताच त्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा झाली. आता कांदा न पिकवणाऱ्या लाभार्थीकडून ही रक्कम परत घेतली जाणार असल्याने संबंधित शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहे व आता आपल्याप्रती सहानुभूती निर्माण व्हावी म्हणून एका गावात चक्क कांदा अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांनी पैसे काढून गाव जेवण दिल्याची जोरदार चर्चा आहे.

व्यापाऱ्यांचे बैंक खात्यांची चौकशी होणार?

कांदा अनुदान घोटाळ्यात व्यापारी यांची प्रमुख भूमिका आहे कारण जर या व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी केला असेल तर यांच्याजवळ त्यांच्या बैंक खात्यातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चेक द्वारे कांदा खरेदीचे पैसे दिले गेले असतील आणि म्हणून अगोदर व्यापाऱ्यांच्या बैंक खात्याची चौकशी होणे गरजेचे आहे.या संदर्भात जिल्हा उपनिबंधक प्रशांत धोटे यांना विचारले असता ते म्हणाले की, ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा झाली आहे. त्यांचे बँक खाते सध्या ब्लॉक केले आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी पैशाची उचल केली त्यांच्याकडून चौकशीअंती ती रक्कम वसूल करण्यात येणार आहे. व्यापाऱ्यांच्या बँक खात्यांची चौकशी होणार असल्याचे आणि यातील दोषी व्यक्तींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे धोटे यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here