अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी
चंद्रपूर :- सर्वसामान्य व गरजूंना केवळ 10, रुपयात जेवण देऊन त्यांची भूक भागविणाऱ्या शिवभोजन केंद्राच्या संचालकांचे मागील तीन महिन्यां पासून अनुदान थकीत असल्याने केंद्र संचालकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्वरित शिवभोजन केंद्रांचे अनुदान देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
शिवभोजनसंचालकांची किराण्याची उधारी थकली
मागील तीन महिन्यांपासून अनुदान रखडल्याने केंद्र संचालक किराणा साहित्याची उधारीवर खरेदी करत आहेत. तीन महिन्यांपासून उधारी देत नसल्याने किराणा व्यावसायिकांनी केंद्र संचालकांना उधारी देणेच बंद केले आहे. त्यामुळे आता कुठून साहित्य आणायचे आणि गरजूंची भूक कशी भागवायची, असा प्रश्न केंद्र संचालकांना पडला आहे.
गरजूंची भूक भागविता यावी यासाठी महाविकास आघाडी सरकारने संपूर्ण राज्यात शिवभोजन केंद्राची योजना सुरू केली. या योजनेंतर्गत गरजूंना केवळ 10 रुपयात भोजन देण्याची तरतूद आहे. जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागााला मिळून ४८ शिवभोजन केंद्र आहेत.शहरी भागातील केंद्राला शासनाकडून एका थाळीवर ४० रुपये अनुदान, तर ग्रामीण भागातील केंद्राला एका थाळीला २५ रुपये अनुदान मिळते. मात्र, मागील जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर असे तीन महिन्यांचे अनुदान थकीत आहे. अनेकदा थकीत अनुदान अदा करण्याची मागणी केंद्र संचालकांकडून करण्यात आली. मात्र, अद्यापही त्यांना अनुदान देण्यात आलेले नाही. परिणामी शिवभोजन संचालकांना आर्थिक अडचण भासत आहे.