Home चंद्रपूर विदर्भातील प्रमुख शक्तीपीठ चंद्रपूरातील सुप्रसिद्ध असे महाकाली देवीचे मंदिर

विदर्भातील प्रमुख शक्तीपीठ चंद्रपूरातील सुप्रसिद्ध असे महाकाली देवीचे मंदिर

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांमध्ये सामाविष्ट नसलेले परंतु विदर्भातील प्रमुख शक्तीपीठ मानले गेलेलं ठिकाण म्हणजे चंद्रपूरातील सुप्रसिद्ध असे महाकाली देवीचे मंदिर. चंद्रपूर परकोटाच्या बाहेर, अंचलेश्वर मंदिराच्या जवळील झरपट नदीच्या दक्षिणेस, चंद्रपूर-अहेरी मार्गावर हे महाकालीचे मंदिर आहे. मूळ मंदिर गोंड राजा खांडक्या बल्लाळ शाह (१४७२-१४९७) याने बांधल्याचे म्हटले जाते. नदीच्या दक्षिण काठावरील खडकातील एका भुयारात महाकालीची कोरीव मूर्ती (वाकाटककालीन) दिसून आल्याने राजाने त्याच जागी एक छोटेखानी मंदिर बांधून घेतले. खांडक्या बल्लाळ शाह नंतर आलेले सर्व गोंड राजे महाकालीचे भक्त बनले, आणि महाकाली चंद्रपूरच्या गोंड राजघराण्याची मुख्यदेवता बनली. आज आपल्याला जे मंदिर दिसून येते ते राणी हिराईने आपल्या पतीच्या म्हणजेच राजा बीर शाहच्या आपल्या जावयावरील विजयाप्रीत्यर्थ बांधलेले आहे.

राजा बीर शाह (१६९६-१७०४) आणि राणी हिराई यांना ‘मानकुंवर’ नावाची एक मुलगी होती. तिचा विवाह देवगडचा (वैरागड जवळील) जमीनदार दुर्गपाल (दुर्गशाह) याच्याशी करून देण्यात आला होता. परंतु दुर्गपालने तिचा छळ करून तिला हिणकस वागणूक दिली. याचे वृत्त राजा बीर शाहला समजताच त्याचा संताप अनावर झाला, आणि त्याने दुर्गपालला याबद्दल कडक शासन करण्याची प्रतिज्ञा घेतली. दुर्गपालविरुद्धच्या लढाईत विजय झाल्यास दुर्गपालाचे शीर महाकाली देवीला अर्पण करून आहे त्या ठिकाणी तिचे भव्य मंदिर बांधण्याचा संकल्प बीर शाहने सोडला.

१७०२ च्या सुमारास गडचिरोलीच्या वैरागडजवळील जंगलात झालेल्या अटीतटीच्या या लढाईत दुर्गपालचा पराभव होऊन तो मारला गेला. देवीला दिलेल्या वचनाला जागून बीर शाहने दुर्गपालाचे शीर धडापासून वेगळे केले आणि देवीला विधीपूर्वक अर्पण केले. राजा बीर शाहच्या मृत्यूनंतर इ.स. १७१० मध्ये जेंव्हा राणी हिराईने त्याठिकाणी प्रचंड भव्य मंदिर बांधले, तेव्हा दुर्गपालाचे प्रतीकात्मक दगडी रूपातील शीर मंदिराच्या उत्तर शिखराजवळ लावण्यात आले. महाकालीचे हे मंदिर आजही बीर शाहच्या त्या विजयाचे व दुर्गपालच्या दुर्दैवी अंताचे स्मरण करून देते.

स्त्रीयांवरील अन्यायाचा सूड व अधर्मी प्रवृत्तीचा नाश करण्यात सहाय्यभूत झाल्याने महाकालीचे महत्व सहस्त्रगुणीत झाले. राणी हिराईने देवीसमोर चैत्र पौर्णिमेस यात्रा भरविणे सुरु केले. परंतु पुढे यात्रेतील चोर, दरोडेखोरांचे प्रमाण वाढल्याने भोसले राजांनी ही यात्रा बंद केली. पुढे ब्रिटिशकाळात नांदेडच्या राजाबाई देवकरीण हिला देवीने दृष्टांत देऊन यात्रा पुन्हा सुरु करण्याचा संकेत दिला. तेंव्हापासून ही देवकरीण हजारो भक्तांसह नांदेडवरून देवीच्या दर्शनास येऊ लागली.

त्यामुळे चैत्र पौर्णिमेच्या महाकालीच्या यात्रेस ‘नांदेडची यात्रा’ सुद्धा म्हटले जाते. विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक, तेलंगाणा, आंध्रप्रदेश, छत्तीसगड, मध्यप्रदेश या भागातून हजारोंच्या संख्येने भाविक यात्रेत सामील होतात. या जथ्यात महार, मांग, गारोडी, कैकाडी, कुणबी असे कैक जातीचे लोक येतात. “मला वरदेहून दिसे, गड चांद्याची चांदणी…गोंडराजाची बांधणी”, “आली आलीया महाकाली तिचा कळेना अनुभवू”, “माय माझी महाकाली तू सत्वाची गं धार” अशी कित्येक लोकगीते या यात्रेत ऐकू येतात. गोरगरिबांची माऊली असलेल्या महाकालीच्या भेटीने कृतार्थ होऊन खेड्यापाड्यातील बाया-बापडे आपल्या परिवारासोबत महाकालीची गाणी आळवत परतीची वाट धरतात. सर्वार्थाने हा आनंदसोहळा प्रत्यक्ष भेट देऊन अनुभवावा असाच आहे.

Previous articleचंद्रपूर शहरासाठी अमृत-2 अभियानांतर्गत चंद्रपूर शहरासाठी 270.13 कोटी रुपयांच्या वाढीव पाणी पुरवठा प्रकल्पास प्रशासकीय योजना मंजूर
Next articleअनधिकृत ले आऊट वरील बांधकामावर मनपाची कारवाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here