Home Breaking News आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्यांना चपराक

आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्यांना चपराक

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

वढोली  :-  आई- वडिलांचा व आजी- आजोबा, अशा ज्येष्ठ नागरिकांचा सांभाळ करणे खरेतर मुलाबाळांचे व नातवंडांचे कर्तव्य आहे. परंतु समाजात काही मुले, मुली, नातवंडे आपली परिस्थिती चांगली असूनसुद्धा आई- वडिलांचा, आजी आजोबांचा सांभाळ करत नाहीत. अशाच एका घटनेत उपविभागीय अधिकारी बालाजी शेवाळे यांनी तक्रारीची तात्काळ दखल घेत निर्वाह कल्याण अधिनियम २००७ नुसार ज्येष्ठांच्या पाल्यांना निर्वाह भत्ता देण्याचा आदेश पारित केला आहे.

मेघराज माधव पिंपळशेंडे (७१), रा. तालुका पोंभुर्णा यांनी आई- वडिलांचे व ज्येष्ठ नागरिक निर्वाह व कल्याण अधिनियमानुसार निर्वाह भत्ता मिळण्याबाबत गोंडपिपरी- पोंभुर्णाचे उपविभागीय अधिकारी बालाजी शेवाळे यांच्याकडे मुलगा सत्यपाल पिंपळशेंडे, सचिन पिंपळशेंडे यांच्याविरोधात अर्ज दाखल केला. त्यांची ही दोन्ही मुले शासकीय नोकरीवर असून, सांभाळ करत नसल्याने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे मेघराज यांनी धाव घेतली.

प्रकरणाची गंभीर दखल घेत सर्व कागदपत्रांची तपासणी करण्यात आली व चौकशीअंती उपविभागीय अधिकारी बालाजी शेवाळे यांनी दोन्ही मुलांना ज्येष्ठ आई- वडिलांना प्रत्येकी पाच हजार रुपये प्रतिमाह निर्वाह भत्ता देण्याचा आदेश पारित केला. त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असून, नोकरदार मुलांनाही चांगलीच चपराक बसली आहे.

निर्वाह भत्ता देण्याचा एसडीओंचा आदेश

आई- वडिलांचे व ज्येष्ठ नागरिक निर्वाह व कल्याण अधिनियम २००७ कलम ५ पोट कलम (१) नुसार निर्वाह भत्ता मिळण्यासंदर्भात अर्ज दाखल झाला होता. अर्जदाराला प्रतिमाह पाच हजार रुपये भत्ता देण्याचा आदेश दोन्ही मुलांना दिला आहे. आदेशाचे पालन न केल्यास एक महिन्याच्या कारावासाची तरतूद कायद्यात आहे. आदेशाचे पालन करावे, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल.बालाजी शेवाळे, उपविभागीय अधिकारी, गोंडपिपरी 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here