मराठी पत्रकार दिनी साहित्यिक व मान्यवर पत्रकारांच्या वैचारिक तोफा धडाडल्या.
चंद्रपूर :-
बदलत्या काळानुसार वृत्तपत्राचे किंबहुना पत्रकारितेचे स्वरूप बदलत गेले आणि आता तर त्यात फारच बदल झाला आहे. इंटरनेटच्या दुनियेत सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जाळे सर्वत्र पसरलेले आहे आणि यात पत्रकार किंवा बातमीदार कुठेतरी हरवला असल्याचे दिसत आहे. प्रिंट मीडिया या माध्यमावर सुद्धा वाचकांचा विश्वास उरला नाही कारण वर्तमानपत्र उघडलं की जाहिराती दिसतात, विविध कार्यक्रमांच्या बातम्या दिसतात, पण शोध पत्रकारितेतून एखादी नावीन्यपूर्ण बातमी, अन्यायापिडीतांना न्याय मिळेल अशा पद्धतीने प्रस्थापितविरोधात चालवलेली बातमी दिसत नाही, पर्यायाने पत्रकारिता बाजारू बनली असल्याचे दिसत आहे, त्यात आता ढगभर न्यूज पोर्टल झाले पण काही वगळता सर्व कॉपी करून तिथे बातम्या टाकल्या जातात अशा परिस्थितीत काही बोटावर मोजन्याइतपत इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मिडीयाचे प्रतिनिधी व न्यूज पोर्टल चे संपादक आपल्या लेखणीतून पत्रकारिता टिकवून ठेवताना दिसत आहे आणि त्यामुळेच काही अंशी का असेना पत्रकारिता जिवंत आहे असे मानल्या जाते अशा शब्दात चंद्रपूर शहरातील शामाप्रसाद मुखर्जी वाचनालय सभागृहात मराठी पत्रकार दिनी झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या तोफा धडाडल्या आहे.
6 जानेवारी हा पहिले मराठी वृत्तपत्र काढणारे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती प्रित्यर्थ मराठी पत्रकार दिन म्हणून राज्यात साजरा होतो, याच दिवशी 1832 ला आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी पहिले वृत्तपत्र दर्पण सुरू केले व मराठी वृत्तपत्राचे ते जनक ठरले, त्यानंतर अनेक मराठी वृत्तपत्र उदयास आले लोकमान्य टिळकांनीही मराठा व केसरी हे वृत्तपत्र सुरू केले. या माध्यमाने त्यांनी जनतेमध्ये स्वातंत्र्याची ज्योत पेटवली व त्यांच्या संपादित लेखातून प्रेरित होऊन अनेक क्रांतिवीर झाले व त्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला असे हे वृत्तपत्र म्हणजे समाजमन घडवणारे एक माध्यम आहे, पण देशात ज्या पद्धतीने देशाची मीडिया सत्तेच्या लोकांची गुलामी करत आहे, देशात गंभीर असलेले मुद्दे, जिवंत आणि ज्वलंत असलेले प्रश्न यावर कुठलीही चर्चा होतं नाही, विकासाच्या मुद्द्यावर चर्चा होतं नाही तर धर्मांधपणा व जातीयता हे विषय समोर केल्या जाते व त्यावरच यांचे शो चालवले जातात व जनतेला मूळ मुद्द्यापासून भरगळले जातात.
पूर्वीच्या वृत्तपत्रात आणि आताच्या वृत्तपत्रात फरक जाणवतो. हा फरक वृत्तपत्रांचा नसून पत्रकारितेचा आहे. हे प्रकर्षाने लक्षात येते. हळूहळू पत्रकारांवरील विश्वास लोकांचा कमी होत आहे का? हा सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, याची कारण मीमांसा केली तर, कुठेतरी बायस पत्रकारिता वाढते आहे का? एखाद्ये वृत्तपत्र हे एकांगी विचार मांडते किंवा पक्षपातीपणा करते असे आता बघावयास मिळते, त्यात पत्रकारांची विविध राजकीय पक्ष, नेते, पुढारी यांचे प्रती वाढलेली निष्ठा त्यामुळेच कदाचित खऱ्या घटना, बातम्या या समाजासमोर मांडला जात नाही का? असे विचार नक्कीच वाचकांच्या मनात येतात म्हणूनच काळ परत्वे पत्रकारांची किंवा बातमीदारांची भूमिका ही बदललेली दिसते, जे वृत्तपत्र समाजाचा आरसा आहे लोकांमध्ये जागरूकता आणण्याचे बळ ज्या लेखणीत आहे. ही लेखणी विकली तर गेली नाही ना? अशी शंका साहजिकच मनात येऊन जाते, पत्रकारांनी स्वतःची भूमिका लक्षात घेतली पाहिजे. कोणत्याही पक्षाच्या अधिकाऱ्यांच्या किंवा नेत्यांच्या दावणीला बांधलेले राहण्यापेक्षा व पत्रकारितेकडे व्यवसाय म्हणून बघण्यापेक्षा निरपेक्ष पत्रकारिता करण्याकडे कल असला पाहिजे तरच समाज पत्रकारांकडे सन्मानाने बघेल कारण निर्भीड व निरपेक्ष व शोध पत्रकारिता कुठेतरी कमी होताना दिसत आहे आणि जे पत्रकार पुढे येऊन अन्यायाला वाचा फोडतात त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केल्या जात आहे मात्र असे असताना पत्रकारांच्या संघटना मृग गळून गप्प बसतात ही एक शोकांतिका आहे. परंतु परिवर्तन घडवायचं असेल तर पत्रकारांनी आपली धारदार लेखणी उचलली पाहिजे आणि राज्य व देशाचा सर्वांगिन विकास घडविण्याच्या कामात आपले योगदान दिले पाहिजे तरच खऱ्या अर्थानं मराठी पत्रकार दिन साजरा केल्याचा सर्व पत्रकारांना अभिमान वाटेल.